Govinda : गोविंदाला चालणं कठीण, व्हिलचेअरवरून घरी; पत्नी सुनीताने काय सांगितलं?
गोविंदाला डिस्चार्ज देण्यात आला. तेव्हा त्याला व्हिलचेअरवरून आणण्यात आलं आहे. गोविंदाची जखम भरली नाही. त्यामुळे त्याला चालण्यास त्रास होत आहे. डॉक्टरांनीही त्यााल पायावर जोर न देण्याचा सल्ला दिला आहे.
मिसफायर झाल्याने गुडघ्याला गोळी लागून अभिनेता गोविंदा मंगळवारी जखमी झाला होता. त्याच्यावर अंधेरीतील क्रिटीकेअर रुग्णालयाच उपचार सुरू होते. त्याच्या तब्येतीसंदर्भात अपडेट्स समोर आले असून त्याला आज डिस्चार्ज मिळाला आहे. चाहत्यांचा लाडका हिरो अखेर आज घरी परतणार आहे. गोविंदा याची पत्नी सुनीता यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. अभिनेत्याला आज रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले होते. अखेर दुपारी 1 च्या सुमारास गोविंदाला डिस्चार्ज मिळाला.
गोविंदाला डिस्चार्ज देण्यात आला. तेव्हा त्याला व्हिलचेअरवरून आणण्यात आलं आहे. गोविंदाची जखम भरली नाही. त्यामुळे त्याला चालण्यास त्रास होत आहे. डॉक्टरांनीही त्याला पायावर जोर न देण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे गोविंदा व्हिलचेअरवरून घरी गेल्याचं सूत्रांनी सांगितलं. गोविंदाला घरी सोडण्यात आल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून आनंदाचे वातावरण आहे.
गोविंदा यांच्या आईचा आशीर्वाद आणि लोकांनी केलेल्या प्रार्थना यांच्यामुळे आता गोविंदा यांची प्रकृती ठीक आहे. थोड्याच दिवसांत ते पुन्हा नाचायला सुरूवात करतील, अशी प्रतिक्रिया सुनीता यांनी दिली.
कशी लागली गोळी ?
मंगळवारी पहाटे 4.45 च्या सुमारास गोविंदा हा कोलकाता येथे जाण्यासाठी निघाला होता. घरातून बाहेर पडताना तो त्याच्याकडे असलेली परवानाधारक रिव्हॉल्वर कपाटात ठेवत होता. त्यावेळी त्याच्या हातातून ती निसटली आणि त्यातून सुटलेली गोळी गोविंदाच्या पायाला लागली. त्यााला तातडीने क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्या पायातली गोळी काढली, नंतर त्याला काही काळ आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर झाल्यावर त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. अखेर आज त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येत असून थोड्याच वेळात तो घरी परतणार आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी गोविंदाची रिव्हॉल्वर जप्त केली आणि आणि याप्रकरणाची चौकशी सुरू केली. गोविंदाला गोळी लागल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. अनेक सेलिब्रिटी देखील त्याच्या भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. सोशल मीडियावर देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले.
गोविंदाला स्वतःच्या पायांवर उभं राहण्यासाठी किती काळ लागेल?
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदाच्या डाव्या पायाच्या हाडाला दुखापत झाली आहे. अभिनेत्याची प्रकृती पूर्ववत होण्यासाठी आणखी 3 ते 4 आठवडे लागतील. गोविंदाच्या पायात घुसलेली गोळी काढण्यात आली असून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. आज त्याला घरी सोडण्यात आलं असलं तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अभिनेत्याला, 3 ते 4 आठवडे आराम करण्याची गरज आहे. चालायचं जरी असेल तरी गोविंदाला काही दिवस वॉकरचा आधार घ्यावा लागणार आहे, असं समजतं.