दिवसरात्र सुरक्षा तरीही इमारतीच्या 12 व्या मजल्यावर तो व्यक्ती पोहोचलाच कसा? त्या ट्रिकमुळे कुणालाच काही कळलं नाही
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या मुंबईतील घरी जीवघेणा हल्ला झाला आहे. एका व्यक्तीने सैफवर चाकूने सहा वार केले आहेत, त्यामुळे तो गंभीर जखमी झाले आहेत. सैफचं घर असलेल्या12 व्या मजल्यावर हा व्यक्ती पोहोचलाच कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुरक्षा व्यवस्थेचा भंग झाल्याने आणि हल्लेखोराचे सैफच्या मोलकरीणीशी काही कनेक्शन असल्याचा संशय आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरी जीवघेणा हल्ला झाला आहे. सैफच्या मोलकरणीशी संबंधित व्यक्तीने त्याच्यावर चाकूने वार केला. एक दोन नव्हे तर सहा वार त्याने सैफवर केले. त्यामुळे सैफ अली खान जखमी झाला आहे. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मात्र, एवढी सुरक्षा असताना आणि सैफ अली खान इमारतीच्या 12 व्या मजल्यावर राहत असताना ही व्यक्ती त्याच्या घरी घुसलीच कशी? असा सवाल केला जात आहे. या व्यक्तीने घरात घुसण्यासाठी जी ट्रिक वापरली त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
अभिनेता सैफ अली खान मुंबईतील वांद्रे येथील सतगुरू शरण अपार्टमेंटमध्ये राहतो. पत्नी करीना आणि दोन मुलांसोबत तो या ठिकाणी राहतो. ही 12 मजली इमारत आहे. सैफ 12 व्या मजल्यावर राहतो. तीन बेडरूम आणि आलिशान हॉल एवढं मोठं त्याचं घर आहे.
सैफ अली खान 12 व्या मजल्यावर राहत असतानाही ही व्यक्ती त्याच्या घरात कशी आली? असा सवाल केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही व्यक्ती इमारतीच्या पाइपलाईनने सैफच्या घरात शिरला. 12 मजले तो पाइपलाईनने चढून आत गेल्याचं सांगितलं जात आहे. सैफच्या इमारतीला प्रचंड सुरक्षा असतानाही ही व्यक्ती पाइपलाईनने चढून घरात शिरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण अजूनही याबाबत नक्की अशी अपडेट मिळू शकलेली नाही.
मणक्याला गंभीर दुखापत
ही व्यक्ती सैफच्या घरात शिरल्यानंतर तो लपून बसला होता. घरातील सर्व जण पार्टीत दंग होते. त्यानंतर रात्री 2 ते अडीच वाजता त्याचे मोलकरणीसोबत वाद सुरू झाले. दोघांचे कडाक्याचे भांडण वाजलं. त्यामुळे सैफ अली खान त्यांचे भांडण मिटवायला गेला. त्यावेळी या व्यक्तीने सैफवर रागाच्या भरात चाकूने वार केले.
सैफवर सहा वार करण्यात आले. त्यामुळे तो जखमी झाला. त्यानंतर लगेचच सैफ अली खानला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर सर्जरी करण्यात आली असून सर्जरीतून एक टोकदार वस्तू बाहेर काढण्यात आली आहे. ही टोकदार वस्तू काय आहे, हे अजून समजलेलं नाही.
पण तो चाकूचा टुकडा असल्याचं सांगितलं जातं. सर्जरीतून टोकदार वस्तू बाहेर काढण्यात आली, याचा अर्थ सैफचा घाव किती खोलवर असेल याचा अंदाजा येतो. सैफच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.
कनेक्शन काय?
दरम्यान, मुंबई पोलिसांनी सैफच्या घरातील तीन लोकांना अधिक चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत. या प्रकरणात मोलकरीण आणि सेक्युरीटी गार्डची या व्यक्तीसोबत मिलीभगत तर नाही ना? याचाही शोध घेतला जाणार आहे. या लोकांच्या साक्षीतून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
मात्र, सध्या तरी चोरी करण्यासाठीच ही व्यक्ती सैफच्या घरात आल्याचं सांगितलं जात आहे. जर ही व्यक्ती चोर असेल तर त्याचं मोलकरणीशी काय कनेक्शन आहे? यापूर्वीही ही व्यक्ती सैफच्या घरात आली होती का? सैफच्या घरात यापूर्वी त्याने चोरी केली होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस चौकशीतून समोर येणार आहे.