मुंबई : एअरपोर्ट, रेस्टॉरंट्स आणि आयपीएल मॅचदरम्यान एकत्र पाहिल्यानंतरही अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकीय नेते राघव चड्ढा यांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल मौन बाळगणं पसंत केलं. दिल्लीतल्या कपुरथळा इथल्या निवासस्थानी शनिवारी (13 मे) साखरपुडा पार पडल्यानंतरच दोघांनी हे नातं अधिकृतरित्या जगासमोर आणलं. या साखरपुड्यानंतर आता परिणीतीचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. तुझ्या जीवनसाथीमध्ये कोणते गुण असावेत असं तुला वाटतं, असा प्रश्न परिणीतीला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. 2014 मधील तिची ही मुलाखत आहे. या प्रश्नाचं परिणीतीने जे उत्तर दिलं, त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर होतेय.
“मी एका सक्षम आणि शक्तीशाली पुरुषाच्या प्रेमात पडू शकते. त्याची विनोदबुद्धीही चांगली असावी. तो संवेदनशील आणि समजुतदार असावा. हे सर्व गुण असले आणि तो माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा असला तरी मला काही फरक पडत नाही”, असं उत्तर परिणीतीने दिलं होतं. याच मुलाखतीत परिणीतीला तिच्या परफेक्ट रोमँटिक डेटबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती पुढे म्हणाली, “मी कधीच रोमँटिक डेटवर गेले नाही. जर मी प्रेमात पडले, तर मी नक्कीच अशा रोमँटिक डेटवर जाईन. जर मी त्या व्यक्तीच्या प्रेमात पडले, तरच मी त्याच्यासोबत डेटवर जाईन.”
या मुलाखतीच्या नऊ वर्षांनंतर परिणीतीने राघव चड्ढा यांच्याशी साखरपुडा केला आहे. हे दोघं 34 वर्षांचे आहेत. 1988 या एकाच वर्षी दोघांचा जन्म झाला. परिणीतीचा वाढदिवस 22 ऑक्टोबर रोजी तर राघव यांचा वाढदिवस 11 नोव्हेंबर रोजी असतो.
काही दिवसांपूर्वी परिणीतीची आणखी एक जुनी मुलाखत व्हायरल झाली होती. “मी कधीच राजकारण्याशी लग्न करणार नाही”, असं ती यामध्ये म्हणाली होती. परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे ‘हंसी तो फंसी’ या चित्रपटाचं प्रमोशन करत होते, तेव्हाचा हा व्हिडीओ होता. या मुलाखतीतील रॅपिड फायर प्रश्नांदरम्यान परिणीतीला अशा सेलिब्रिटींची नावं विचारली गेली, ज्यांच्याशी ती लग्न करू इच्छिते. या प्रश्नाचं उत्तर देताना परिणीतीने हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिटचं नाव घेतलं. त्यानंतर तिला राजकारण्यांची नावं विचारली गेली. तेव्हा ती म्हणाली, “समस्या अशी आहे की मला कोणत्याच राजकारण्याशी लग्न करायचं नाही. खरंतर बरेच चांगले पर्याय आहेत पण मला कधीच राजकारण्याशी लग्न करायचं नाही.”