मुंबई: अभिनेत्री राखी सावंतच्या वैवाहिक आयुष्यातील समस्या काही केल्या संपत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी राखीचा पती आदिल खान दुर्रानीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र आदिलला पोलीस कोठडी मिळावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून खूप प्रयत्न केल्याचं राखीने सांगितलं. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत राखी आदिलबद्दल बोलताना ढसाढसा रडली. इतकंच नव्हे तर तो सुटला की मला मारून टाकेल, असंही राखी म्हणाली.
“मी आदिलला माफ केलं होतं आणि त्याला पुन्हा माझ्यासोबत संसार करण्याची विनंती केली. पण त्याने ऐकलं नाही. तो म्हणाला, मी तुला सोडू शकतो पण तिला नाही. मग आता जर तो तिला सोडू शकत नसेल तर मी त्याला सोडणार नाही. आदिलला अटक केल्यानंतर कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याला पोलीस कोठडी मिळावी यासाठी आम्ही गेल्या आठ दिवसांपासून प्रयत्न करतोय. त्याच्यावर दुसरे खटलेसुद्धा दाखल आहेत”, असं राखी म्हणाली.
कॅमेरासमोर आईची आठवण काढत राखी यावेळी ढसाढसा रडली. “आता पोलीस आदिलची चौकशी करणार आहेत. मी देवाकडे हीच प्रार्थना करतेय की त्याला जामिन मिळू नये. नाहीतर मला तो मारून टाकेल. त्याने मला इस्लाम कबूल करायला लावलं. आता इस्लाम कबूल केल्यानंतर व्हॅलेंटाइन डेला तो मला घटस्फोट देत होता. मी त्याला घटस्फोट देणार नाही. मी आदिलला धडा शिकवणार आहे. लग्न करून तुम्ही महिलेचा वापर करता आणि तिला लुटता. मी हे माझ्यासोबत होऊ देणार नाही. तो माझ्या आयुष्याशी खेळतोय. लग्नानंतर मी आठ महिने गप्प पाहिले”, असं ती पुढे म्हणाली.
आदिलशी लग्न करण्यासाठी राखीने इस्लाम धर्म स्वीकारला होता. मात्र लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला आदिलने तिला स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हापासून राखी माध्यमांसमोर येऊन आदिलविरोधात विविध आरोप करू लागली. आदिलचे विवाहबाह्य संबंध असल्याचंही तिने म्हटलंय. तनू चंडेल असं त्या मुलीचं नाव आहे, हा खुलासाही तिने केला.
आदिलनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याच्यावरील आरोपांवर प्रतिक्रिया दिली होती. ‘ज्या पद्धतीने तिने म्हटलं की ती फ्रीजमध्ये राहणार नाही, त्यावर मीसुद्धा बोलू शकतो की मला सुशांत सिंह राजपूत नाही व्हायचंय. ती मला म्हणते की आदिल मुंबई माझी आहे, इथे काहीही होऊ शकतं. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की सत्य जाणून घेतल्याशिवाय माझ्याबद्दल कोणतंही मत बनवू नका. कोण काय आहे हे योग्य वेळीच समोर येईल’, असं त्याने लिहिलं होतं.