मोहाली : कॅनडास्थित प्रसिद्ध पंजाबी गायक शुभला आता भारताची आठवण झाली आहे. त्याचा भारतात होणार टूर रद्द झाला आहे. शुभने आता त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये “भारत माझाही देश आहे. माझा जन्म इथे झाला. ही माझ्या गुरुंची आणि पूर्वजांची भूमी आहे” असं म्हटलं आहे. भारताचा चुकीचा नकाशा शेअर केला तसेच खलिस्तानी गटांना पाठिंबा दिल्यामुळे शुभचा भारत दौरा रद्द झाला. त्याच्या भारत दौऱ्याला मोठ्या प्रमाणात विरोध सुरु होता. शुभच्या कार्यक्रमांविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली होती. खलिस्तानच समर्थन आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगल्याचा आरोप शुभवर होता. सोशल मीडियावरुन त्याने खलिस्तानी घटकांना पाठिंबा दिल्याबद्दल त्याच्यावर बरीच टीका झाली. मुंबईत होणारा त्याचा कार्यक्रम रद्द झाला.
“मी भारतातील पंजाबमधून येणारा एका युवा रॅपर, गायक आहे. आपलं संगीत आंतरराष्ट्रीय मंचावर घेऊन जाण्याच माझं स्वप्न होतं. सध्या ज्या घडामोडी सुरु आहेत, त्यामध्ये माझी मेहनत आणि प्रगती ढेपाळून गेलीय. सध्या मला जो त्रास होतोय, दु:ख आहे, त्या बद्दल मला काही शब्द बोलायचे आहेत. भारत दौरा रद्द झाल्याने माझा उत्साह मावळून गेलाय, मी निराश झालोय. माझ्या देशात, माझ्या लोकांसमोर परफॉर्म करण्यासाठी मी खूप उत्साहीत होतो. जोरात तयारी सुरु होती. मागच्या दोन महिन्यापासून मी भारत दौऱ्यासाठी मनापासून प्रयत्न करत होतो. मी परफॉर्म करण्यासाठी खूप उत्साही आणि आनंदी होतो. पण नियतीच्या मनात दुसरच काही होतं” असं शुभने म्हटलय.
‘पंजाबींना देशभक्तीचा पुरावा देण्याची गरज नाही’
“भारत माझाही देश आहे. माझा जन्म इथे झाला. ही माझ्या गुरुंची आणि पूर्वजांची भूमी आहे. या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सुद्धा बलिदान दिलय. पंजाब माझ्या रक्तात आहे. पंजाब माझा आत्मा आहे. मी आज जे काही आहे, ते पंजाबी असण्यामुळेच. पंजाबींना देशभक्तीचा पुरावा देण्याची गरज नाही. इतिहासाच्या प्रत्येक वळणावर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी पंजाबी व्यक्तींनी बलिदान दिलय. म्हणून मी तुम्हाला नम्र विनंती करतो की, तुम्ही प्रत्येक पंजाबी व्यक्तीला फुटीरतवादी किंवा देशविरोधी ठरवू नका” असं शुभने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सध्या भारत आणि कॅनडाचे संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. दररोज दोन्ही देश परस्परांविरुद्ध काही निर्णय घेत आहेत.