अहमदाबाद : आयपीएल 2023 चा फिनाले मॅच खूपच खासच झाला. चेन्नई सुपरकिंग्सने पुन्हा एकदा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. अंतिम सामना पाहण्यासाठी अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान हे अहमदाबादच्या स्टेडियमवर पोहोचले होते. हे दोघं सुरुवातीला गुजरात टायटन्स टीमला पाठिंबा देताना दिसले. मात्र गुजरातच्या पराभवानंतर विकी आणि साराने सीएसकेच्या विजयाचा जल्लोष केला. या गोष्टीवरून सध्या दोघांना नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जातंय.
सारा अली खान आणि विकी कौशल हे सुरुवातीला गुजरात टायटन्सला पाठिंबा देत होते. हे दोघं हार्दिक पांड्याच्या टीमसाठी जोरजोरात चीअर करत होते. मात्र जेव्हा राशिद खान बाद झाला तेव्हा सारा खूप चकीत झाली. विकीसुद्धा गुजरातच्या धावांवर आनंद व्यक्त करताना दिसला होता. अखेर जेव्हा चेन्नई सुपरकिंग्सचा विजय झाला, तेव्हा विकीने सोशल मीडिया व्हिडीओ पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या व्हिडीओमध्ये विकी आणि साराच्या चेहऱ्यावर आनंद सहज पहायला मिळतोय. हे दोघं अशा पद्धतीने आनंद व्यक्त करत होते, जसं की ते सुरुवातीपासूनच सीएसकेच्या बाजूने होते. नेटकऱ्यांनी ही गोष्ट हेरली आणि नंतर त्यावरूनच ट्रोल करण्यास सुरुवात केली.
‘बदले तेरे माही, लेके जो कोई सारी दुनिया भी देदे अगर, तो किसे दुनिया चाहिए? विजयासाठी माहीला शुभेच्छा आणि जड्डू तू तर रॉकस्टार आहेस. अप्रतिम सामना होता. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये गुजरात टायटन्स ही सर्वोत्कृष्ट टीम होती,’ असं कॅप्शन देत विकीने व्हिडीओ पोस्ट केला. त्यावर एकाने लिहिलं, ‘दोघंही कमालीचं अभिनय करत आहात’. तर ‘भावा, नक्की तू कोणाच्या बाजूने आहेस’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला.
अभिनेत्री सारा अली खानलाही नेटकरी ट्रोल करू लागले आहेत. क्रिकेटर शुभमग गिल आणि सारा यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा आहेत. त्यामुळे शुभमन जेव्हा लवकर बाद झाला, तेव्हा नेटकऱ्यांनी साराला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘ज्याप्रकारे सारा आनंद व्यक्त करतेय, ते पाहून असं वाटतंय की तिचं शुभमनसोबत ब्रेकअप झालंय’, असंही एकाने लिहिलंय.
चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे. चेन्नईने पहिल्यांदा 2010 मध्ये मुंबई इंडियन्सला पराभूत करत आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून चेन्नईने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 अशा एकूण 5 वेळा हा दमदार कारनामा केला आहे. चेन्नईने यासह मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मुंबईनेही 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.