मुंबई : जळगावातील शासकीय वसतिगृहात पोलिसांनी तरुणी, महिला यांना निर्वस्त्र करुन नाचण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या निमित्ताने जळगावातच तब्बल 27 वर्षांपूर्वी उघडकीस आलेले जळगाव बलात्कार प्रकरण (Jalgaon rape case) किंवा जळगाव सेक्स स्कँडल (Jalgaon sex scandal) पुन्हा चर्चेत आले आहे. यामध्ये बिझनेसमन, राजकारणींसारख्या धनाढ्य व्यक्तींचे हात बरबटले होते. दिवंगत अभिनेत्री-निर्मात्या स्मिता तळवलकर यांनी जवळपास दहा वर्षांपूर्वी या प्रकरणावर आधारित ‘लज्जा’ ही मालिका आणली होती. गिरीजा ओक-गोडबोले, नीना कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, मुक्ता बर्वे, सुकन्या मोने, लोकेश गुप्ते, पियुष रानडे, राजन ताम्हाणे यासारख्या कलाकारांच्या भूमिका होत्या. (Jalgaon rape case based Zee Marathi Serial Lajja Jalgaon Women’s Hostel Case)
आपापल्या कार्यक्षेत्रात उच्च स्थानांवर असूनही प्रत्येक स्त्री वैयक्तिक आयुष्यात कशाप्रकारे वेगवेगळ्या प्रश्रांना तोंड देत असते, याचं चित्रण लज्जा मालिकेतून करण्यात आले होते. लज्जा मालिकेच्या शीर्षकगीतातच ‘लज्जा.. असते आभूषण स्त्रीचे, तिजला जपावयाची असते’ असा उल्लेख स्त्रियांच्या चारित्र्यासारख्या नाजूक विषयावर बोट ठेवणारा आहे.
काय होतं कथानक?
मनूचे (गिरीजा ओक) लग्न वसुमती (नीना कुलकर्णी) यांचा मुलगा अभिमानशी ठरते. परंतु मंगेश (लोकेश गुप्ते) तिला लग्नाची मागणी घालतो. त्यामुळे मनू ठरलेले लग्न मोडते. एके दिवशी मंगेश जाहिरातीसाठी फोटोसेशन करण्याच्या बहाण्याने तिला लॉजवर नेतो. तिला कोल्डड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिचे अश्लील फोटो काढतो. त्यानंतर ते फोटो पाठवून तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो.
मनू त्याच्या मागण्यांना भीक न घालता पोलिस निरीक्षकाशी (पियुष रानडे) लग्न करते. त्यानंतर मंगेशविरोधात तिचा लढा सुरु होते. या मार्गात तिच्या वाटेत अनेक अडथळे येतात. परंतु तिला साथ मिळते सासू (सुकन्या मोने), वसुमती ताई (नीना कुलकर्णी), अत्याचाराला बळी पडलेली तरुणी (तेजस्विनी पंडित) वकील मीरा (मुक्ता बर्वे) यांची.
मालिकेत दोन्ही आरोपींची हत्या
या सर्वात मनूने केस जिंकली, मंगेशला शिक्षा झाली. विशेष म्हणजे या रॅकेटचा मालक निघतो साहेब, अर्थात वसुमतीचा नवरा (राजन ताम्हाणे). हे समजल्यावर प्रसंगी वसुमतीच त्याचा खून करते. मालिकेच्या शेवटच्या भागात मनू तलवारीने मंगेशची हत्या करते. मात्र प्रत्यक्षदर्शी हा खुनाचा आळ स्वत:वर घेण्यासाठी धडपड करताना दाखवले. यातूनच जनतेच्या मनात आरोपीविषयी किती टोकाची चीड आणि मनूला कशी साथ होती, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. (Jalgaon rape case based Zee Marathi Serial Lajja Jalgaon Women’s Hostel Case)
जळगाव सेक्स स्कँडल काय होतं?
कॉलेज कॅम्पस, ब्युटी पार्लर, आईस्क्रिम पार्लर, हॉस्पिटल किंवा बस स्थानकांवर शाळकरी विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुणी, महिलांना हेरलं जायचं. त्यांना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात. त्यांचे नग्नावस्थेत फोटो काढले जात असत. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केलं जात असे. या तरुणींना नंतर बिझनेसमन, राजकारणी यासारख्या उच्चभ्रू लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं जात असे. थोडक्यात ब्लॅकमेल करुन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात.
जळगाव आणि भुसावळमध्ये मिळून 12 बलात्कारांसह वीस लैंगिक अत्याचाराच्या केस नोंदवण्यात आल्या. काही पीडिता अवघ्या 12 वर्षांच्या होत्या. बहुतांश पीडित तरुणी या गरीब कुटुंबातील होत्या. खरं तर या स्कँडलमध्ये किमान 300 ते 500 महिला अडकल्याचं बोललं जातं. परंतु बदनामीच्या भीतीने असंख्य पीडिता समोरच न आल्याचा अंदाज आहे.
जळगावच्या सरकारी महिला हॉस्टेलमध्ये नेमकं काय घडलं? पीडितेची आपबिती
संबंधित बातम्या :
पोलिसांनी तरुणींना कपडे काढून नाचायला लावलं, महिला वसतिगृहात धक्कादायक प्रकार
(Jalgaon rape case based Zee Marathi Serial Lajja Jalgaon Women’s Hostel Case)