गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत. नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यात जेव्हा ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीय वेगवेगळे आले, तेव्हा या चर्चांना आणखी उधाण आलं. या चर्चांना आणखी हवा अभिषेकच्या एका कृतीने दिली. सोशल मीडियावर घटस्फोटाबद्दलची एक पोस्ट त्याने लाइक केली होती. त्यावरून पुन्हा एकदा या दोघांमध्ये काही आलबेल नसल्याचं म्हटलं गेलं. या चर्चांदरम्यान ऐश्वर्याची सासू आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मुलाखतीत त्या सून ऐश्वर्याचा असा एक गुण सांगतात, ज्यामुळे नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत.
या व्हिडीओमध्ये जया बच्चन या निर्माता-दिग्दर्शक करण जोहरसोबत बोलताना दिसत आहेत. त्या सांगतात, “ती स्वत:सुद्धा खूप मोठी स्टार आहे, पण जेव्हा आम्ही सर्वजण एकत्र असतो तेव्हा मी कधीच असं पाहिलं नाही की ती स्वत:ला सर्वांच्या पुढे ठेवू पाहील. मला तिचा हा गुण आवडतो. ती मागे उभी राहते, गप्प असते आणि ऐकते. ही फार सुंदर गोष्ट आहे की ती खूप चांगल्या प्रकारे या सर्वांत मिसळून गेली आहे. फक्त कुटुंबातच नाही, तिला ही गोष्ट माहीत आहे की हे कुटुंब आहे, चांगले मित्र आहेत. मला असं वाटतं की प्रत्येकाने असं राहावं.” जया यांच्या या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.
‘टॉक्सिक सासू, मागे उभं राहण्याचं समर्थन करतेय, गप्प बसा’, असं एकाने लिहिलं. तर ‘तुम्ही तुमच्या मुलीलाही हाच सल्ला देणार का’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘फक्त बँक बॅलेन्स वेगळा आहे आमचा, पण सासू आमच्यासारखीच आहे’, असंही एकाने उपरोधिकपणे लिहिलं आहे. ‘गप्प राहिली तर चांगली आणि स्टँड घेतला तर वाईट’, असंही काहींनी खोचकपणे म्हटलंय.
ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा असतानाच अंबानींच्या कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेकने वेगवेगळी एण्ट्री केली होती. एकीकडे अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता नंदा, नव्या नंदा, अभिषेक बच्चन, अगस्त्य नंदा हे सर्वजण एकत्र आले होते. तर फक्त ऐश्वर्या आणि आराध्या हे नंतर आले. किमान अभिषेकने तरी त्या दोघींसोबत यायला हवं होतं, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी दिले होते. बच्चन कुटुंबीय आणि ऐश्वर्या यांच्यात नक्कीच काही आलबेल नाही, अशाही चर्चा होत्या.