मुंबई : 28 नोव्हेंबर 2023 | हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालतोय. 24 नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच या चित्रपटाने 1.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यानंतर या आकड्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. सात मैत्रिणींची अनोखी कथा घेऊन हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘झिम्मा’च्या पहिल्या भागालाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना फार उत्सुकता होती. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटांचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
‘झिम्मा 2’ने गेल्या तीन दिवसांत 4.77 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, “प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम सुखावणारं आहे. आम्ही अनेक थिएटर्सना भेट देत आहोत. खूप ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. चित्रपट पाहून प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिक्रिया भारावणाऱ्या आहेत. हा भाग आधीच्या भागापेक्षा अधिक चांगला असल्याच्याही प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक आवर्जून भेटायला येत असून सोशल मीडियावरही अनेकांचे संदेश येत आहेत. प्रेक्षकांकडून ‘झिम्मा २’वर होणारा कौतुकाचा वर्षाव भारी फिलिंग देणारा आहे.”
या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘झिम्मा 2’च्या निमित्ताने पुन्हा एकदा सात जणी एकत्र सहलीला निघाल्या आहेत. मात्र यावेळी दोन नवीन पात्रं या चित्रपटात पहायला मिळतात. त्यापैकी एक म्हणजे निर्मलाची सून तान्या (रिंकू राजगुरू) आणि दुसरी म्हणजे वैशालीची भाची मनाली (शिवानी सुर्वे). ‘झिम्मा’चा पहिला भाग थिएटरमध्ये जवळपास 50 पेक्षा अधिक दिवस होता. 50 दिवसांत या चित्रपटाने तब्बल 14 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
चित्रपटात सात नायिका आणि एक नायक आहे म्हटल्यावर कथेत समतोल साधण्याचं मोठं आव्हान लेखकासमोर असतं. मात्र हे काम इरावती कर्णिक यांनी पुन्हा एकदा तितक्याच सहजतेनं पार पाडलं आहे. विशेष म्हणजे यापैकी कोणाचीच कथा रटाळवाणी वाटत नाही. छोटे छोटे तुकडे एकत्र जोडावेत आणि त्याचा एक मोठा आणि सुंदर चित्र तयार व्हावा, असा हा लेखिकाचा प्रयत्न पुन्हा एकदा यशस्वी ठरतो.