बेंगळुरू: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता तारका रत्न यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर बेंगळुरूमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तारका रत्न हे अभिनेता ज्युनियर एनटीआरचे चुलत भाऊ आहेत. ज्युनियर एनटीआरने रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर ज्युनियर एनटीआरने माध्यमांना तारका रत्न यांच्या तब्येतीविषयीची माहिती. ही माहिती देताना तो भावूक झाल्याचं पहायला मिळालं. भाऊ कल्याण रामसोबत ज्युनियर एनटीआर रविवारी बेंगळुरूला पोहोचला आणि त्याने तारका रत्न यांची भेट घेतली.
“त्यांची प्रकृतीही अद्याप गंभीरच आहे पण ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत आणि ही चांगली बाब आहे. आमच्या आजोबांच्या आशीर्वादाने आणि नंदमुरी यांच्या चाहत्यांच्या प्रार्थनेनं ते लवकरात लवकर बरे होतील”, अशी माहिती ज्युनियर एनटीआरने माध्यमांशी बोलताना दिली.
तारका रत्न यांच्यावर बेंगळुरूमधील नारायण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णालयाकडून शनिवारी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यात आली होती. ’27 जानेवारी रोजी नंदमुरी तारका रत्न यांना कुप्पम याठिकाणी रॅलीदरम्यान कार्डिॲक अरेस्ट आला होता. तिथल्या रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना दुसरीकडे हलविण्याचा सल्ला तिथल्या डॉक्टरांनी दिला. 28 जानेवारी रोजी त्यांना मध्यरात्री 1 वाजता इथल्या रुग्णालयात हलविण्यात आलं. त्यावेळीही त्यांची प्रकृती गंभीर होती. तारका रत्न हे सध्या कार्डिओलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट आणि इतर स्पेशलिस्ट टीमच्या देखरेखीखाली आहेत’, अशी माहिती रुग्णालयाने दिली होती.
टीडीपीचे नेते नारा लोकेश यांच्या राजकीय रॅलीदरम्यान तारका रत्न कार्डिॲक अरेस्टमुळे कोसळले होते. त्यानंतर त्यांना कुप्पम इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.