मुंबई | 25 जुलै 2023 : लहान मुलांसोबत हॉलिवूड चित्रपट ‘बार्बी’ पाहण्याची प्लॅनिंग करत असाल तर थांबा. ग्रेटा गेरविग दिग्दर्शित ‘बार्बी’ या चित्रपटाची सध्या जगभरात तुफान क्रेझ पहायला मिळतेय. बार्बीच्या गुलाबी आणि सुंदर विश्वाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. बार्बी लँडच्या कथेवर आधारित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. म्हणूनच अनेकजण त्यांच्या लहान मुलांसोबत हा चित्रपट पाहण्याचा प्लॅन करत आहेत. ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री जुही परमारसुद्धा तिच्या 10 वर्षांच्या मुलीसोबत हा चित्रपट पहायला गेली होती. मात्र थिएटरमध्ये गेल्यानंतर तिला धक्काच बसला. अवघ्या 15 मिनिटांत ती मुलीला घेऊन थिएटरबाहेर पडली. इतकंच नव्हे तर यानंतर तिने ‘बार्बी’च्या निर्मात्यांना खुलं पत्रसुद्धा लिहिलं आहे.
जुहीने सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने इतर पालकांनाही सल्ला दिला आहे. ‘कदाचित मी जे काही सांगतेय ते वाचून प्रेक्षक खुश होणार नाहीत. कदाचित तुमच्यापैकी काहीजण माझ्यावर नाराजही होतील. मात्र मी ही पोस्ट एका काळजी करणाऱ्या पालकाच्या दृष्टीकोनातून लिहित आहे. त्यामुळे मला चुकीचं समजू नका. जी चूल मी केली ती तुम्ही करू नका. तुमच्या लहान मुलांना चित्रपट दाखविण्याआधी एकदा नीट सर्व गोष्टी तपासून घ्या. निवड तुमची आहे’, असं तिने म्हटलंय.
या पोस्टमध्ये ‘बार्बी’ला उद्देशून ती पुढे म्हणाली, ‘प्रिय बार्बी, मी आधी माझी चूक स्वीकारते. मी माझ्या 10 वर्षांच्या मुलीला घेऊन तुझा चित्रपट पहायला आली होती. त्याआधी मी हे तपासून पाहिलं नव्हतं की हा चित्रपट PG-13 (ज्यामध्ये 13 वर्षांपेक्षा लहान मुला-मुलींसाठी काही सीन्स आक्षेपार्ह असू शकतात) आहे. सुरुवातीच्या दहा मिनिटांतच आक्षेपार्ह भाषा आणि सीन्स होते. अखेर वैतागून मी माझ्या मुलीला घेऊन थिएटरमधून निघाले. माझ्या मुलीला मी हे काय दाखवलं असा मला प्रश्न पडला. ती गेल्या बऱ्याच दिवसांपासून तुझ्या चित्रपटाची वाट पाहत होती. मला खूप मोठा धक्काच बसला आहे. मी निराश झालेय की माझ्या मुलीला मी हे काय दाखवलं?’
‘अवघ्या 10-15 मिनिटांतच मी थिएटरमधून बाहेर पडले. माझ्यानंतर इतरही पालक त्यांच्या मुलांना घेऊन बाहेर पडत होते. तर काहींनी पूर्ण वेळ बसून तो चित्रपट पाहिला. मात्र बार्बी या चित्रपटातील भाषा आणि सीन्स हे 13 वर्षांपेक्षा जास्त मुला-मुलींसाठीही ठीक नाहीत’, असं तिने या पोस्टच्या अखेरीस म्हटलंय.
जुहीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिला संपूर्ण चित्रपट न पाहताच निष्कर्ष काढत असल्याचं म्हटलंय. तर काहींनी तिला इंडस्ट्रीत काम करणारी असून चित्रपटाचं प्रमाणपत्र कसं आधी पाहिलं नाही, असा सवाल केला आहे.