Kangana Ranaut on pay parity in Bollywood : अभिनेत्री प्रियांका चोप्राने (priyanka chopra) अलीकडेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनेत्रींना समान फी न मिळण्याबद्दल बोलली होती. प्रियांकाने तिच्या सिटाडेल या मालिकेच्या प्रमोशनदरम्यान सांगितले होते की, तिच्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच तिला तिच्या पुरुष स्टारच्या बरोबरीने फी मिळाली आहे. आता या मुद्द्यावर कंगना राणौतने (kangana ranaut) प्रियांकाचे समर्थन केले असून प्रियांकाचा व्हिडिओ तिच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे. मात्र, कंगनाने बॉलीवूडच्या ए-लिस्टेड अभिनेत्रीची खिल्लीही उडवली.
प्रियांका म्हणाली होती की, तिने तिच्या करिअरमध्ये 60 चित्रपट केले आहेत पण तिला कधीच पुरुष कलाकारांएवढी फी मिळाली नाही. पुरूष कलाकारांना जेवढे मानधन दिले जात होते त्यातील केवळ 10 टक्के अभिनेत्रींना मिळाले. आता प्रियांकाच्या या विधानाचे समर्थन करत कंगनाने म्हटले आहे की, ती पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे जिने महिला अभिनेत्रींच्या समान मानधनासाठी लढा दिला.
बॉलीवूडमधील ती पहिली अभिनेत्री आहे जिला पुरुष कलाकारांच्या बरोबरीने मानधन मिळते, असेही कंगनाने म्हटले आहे. कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ‘माझ्यापूर्वीच्या अभिनेत्री या दीर्घकाळ चाललेल्या दुटप्पीपणापुढे झुकल्या, हे खरं आहे. या गोष्टीसाठी (समान वेतन) लढणारी मी पहिली अभिनेत्री आहे. यादरम्यान मला अनेक वाईट गोष्टीही जाणवल्या. मी ज्या भूमिकांसाठी लढत होते, त्याच भूमिका (माझ्यासोबतच्या) इतर अभिनेत्री फुकटातही करायला तयार होत्या.’ असे कंगनाने नमूद केले.
एवढेच नव्हे तर बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींची खिल्ली उडवताना, कंगना म्हणाली की, ‘मी या दाव्याचे समर्थन करू शकते की अनेक ए-लिस्टेड महिला अभिनेत्री आहेत ज्या विनामूल्य काम करतात आणि अनेक प्रकारचे फेव्हर्सही देतात. त्यांना काम मिळणे बंद होण्याची भीती असते. मात्र एवढं सगळं करून त्या आपणच कशा सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहोत, असं आर्टिकलही प्रसिद्ध करायला लावतात. इंडस्ट्रीतील प्रत्येकाला माहित आहे की मी एकमेव अभिनेत्री आहे जी पुरुष कलाकारांच्या बरोबरीने शुल्क आकारते.’ असेही कंगनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये खूप सक्रिय आहे. तिथं चांगला पाय रोवल्यानंतर प्रियांकाने बॉलिवूडबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तर दुसरीकडे कंगना राणौत नेहमीच तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना लवकरच ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसणार आहे.