रुट कॅनाल सर्जरीनंतर कन्नड अभिनेत्री (Kannada actor) स्वाती सतीशचा (Swathi Sathish) चेहरा ओळखेनासाच झाला. रुट कॅनाल प्रोसिजरनंतर (root canal procedure) स्वातीच्या चेहऱ्याचा उजवा भाग प्रचंड सुजला. सूज येणं हे अत्यंत सर्वसामान्य साइड इफेक्ट असेल असं डॉक्टरांनी तिला सर्जरीपूर्वी सांगितलं होतं. काही तासांनंतर ती सूज जाईल असंही त्यांनी तिला सांगितलं होतं. मात्र तब्बल 20 दिवसांनंतरही स्वातीचा चेहरा सुजलेलाच आहे. कन्नड माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, स्वातीने संबंधित क्लिनिकवर वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचाही इशारा दिला आहे. कलाविश्वात काम करणाऱ्या अभिनेत्रीसाठी तिचा लूक, चेहरा हे सर्वाधिक जपावं लागतं. मात्र सर्जरीनंतर आपलाच चेहरा आपल्याला ओळखू येत नसल्याचं दु:ख स्वातीने व्यक्त केलं.
चेहऱ्यावरील सूज तशीच राहिल्याने करिअरच्या संधीवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वातीचा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र अशा परिस्थितीमुळे ती तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही बाहेर पडू शकत नसल्याची खंत तिने व्यक्त केली. सध्या ती दुसऱ्या रुग्णालयातून त्यावर उपचार घेत आहे. या प्रकरणावर अद्याप क्लिनिककडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
काही दिवसांपूर्वीच वजन कमी करण्यासाठी केलेली प्लास्टिक सर्जरी ही एका कन्नड अभिनेत्रीच्या जिवावर बेतली. 21 वर्षीय चेतना राज हिचं खासगी रुग्णालयातचं निधन झालं होतं. प्लास्टिक सर्जरीदरम्यान झालेल्या चुकीमुळे चेतनाने जीव गमावल्याचं म्हटलं जातं होतं. नंतर तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली.