Karnan : एका गावाच्या अस्तित्वाची लढाई, कलाकारांचा अफलातून अभिनय, मुक्या जनावरांद्वारे सामाजिक व्यवस्थेवर प्रश्न आणि बरंच काही…

Karnan Movie Review : 'कर्णन' हा दिग्दर्शक मारी सेल्वराजचा मास्टरपीस आहे. सुपरस्टार धनुषसह प्रत्येक कलाकाराने यात अफलातून अभिनय केला आहे.

Karnan : एका गावाच्या अस्तित्वाची लढाई, कलाकारांचा अफलातून अभिनय, मुक्या जनावरांद्वारे सामाजिक व्यवस्थेवर प्रश्न आणि बरंच काही...
Karnan Movie
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 6:10 PM

Karnan Movie Review : जेव्हा कधी एखादी लढाई लढली जाते, तेव्हा ती लढाई लढणाऱ्या दोन पक्षांच्या दोन बाजू असतात. त्यातल्या एका पक्षाला स्वतःला सर्वात सामर्थ्यवान घोषित करायचं असतं, तर दुसरा स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत असतो. किंवा तो त्याच्या सर्व्हायव्हलसाठी लढत असतो. मारी सेल्वराज (Mari Selvaraj) या गुणी दिग्दर्शकाने ‘कर्णन’ (Karnan) या चित्रपटाद्वारे अशीच एक सर्व्हायव्हल स्टोरी आपल्यासमोर मांडली आहे. पण ही सर्व्हायव्हल स्टोरी कोणा एका व्यक्तीची नाही, तर एका संपूर्ण गावाची आहे. सुपरस्टार धनुषचा (Dhanush) हा चित्रपट गेल्या महिन्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. परंतु देशातील कोरोनाची बिघडलेली परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे हा चित्रपट जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही. पण गेल्या आठवड्यात हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आणि चित्रपटाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून देशभर या तमिळ चित्रपटाची चर्चा आहे. (Karnan Movie Review Marathi : Mari Selvaraj’s Masterpiece and Dhanush Outstanding Performances)

‘कर्णन’ या चित्रपटाची कथा 1997 सालची आहे. हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित आहे. तमिळनाडूमधल्या पोडियंकुलम गावात मागासवर्गीय आणि आदिवासी लोक राहतात. या गावात शाळा, दवाखान्यासारख्या कोणत्याही प्राथमिक सुविधा नाहीत. गावालगत एक पक्का रस्ता आहे, अनेक लहान-मोठ्या, साध्या तसेच महागड्या गाड्या या रत्यावरुन धावतात, परंतु एकही बस पोडियंकुलम गावाजवळ थांबत नाही. चित्रपटाच्या कथेची सुरुवात या रस्त्यापासूनच होते. या रस्त्याच्या मधोमध एक लहान मुलगी पडली आहे, तिच्या तोंडातून फेस येतोय, तिला काय झालंय माहिती नाही, ती मरणाला टेकली आहे. परंतु एकही गाडी तिच्यासाठी थांबत नाही. दोन्ही बाजूने अनेक गाड्या ये-जा करतायत पण कुठलीच गाडी तिच्यासाठी थांबत नाही. पाहता पाहता ती प्राण सोडून देते. इथूनच सुरु होतो कर्णन आणि पोडियंकुलम गावाचा संघर्ष.

पोडियंकुलम गावाजवळ कोणतीही बस थांबत नाही, इतकंच काय तर गावाजवळ बस थांबादेखील नाही. त्यामुळे या गावातील लोकांना शेजारच्या मेलूर गावच्या बस स्थानकावर चालत जावं लागतं. तिथूनच त्यांना बस पकडावी लागते. मेलूर गावात सवर्ण, सधन लोक राहतात. येथील सत्ता आणि यंत्रणा मेलूरमधल्या सवर्णांच्या हातात आहे. मेलूरमधल्या काही सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळेच पोडियंकुलमवासी ग्रामस्थ अनेक सुविधांपासून वंचित आहेत. मेलूरमधील सवर्णांना वाटते की पोडियंकुलमवासियंना सुविधा मिळूच नयेत. तशाच पद्धतीने त्यांना वागणूक दिली जाते. उदाहरणार्थ, बस गावाजवळ थांबत नाही, अशा परिस्थितीत पोडियंकुलमवासियांना मेलूर गावच्या बसस्थानकावर जावे लागते. पोडियंकुलमच्या मागासवर्गीयांना कायम आपले आश्रित ठेवण्यासाठी मेलूर गावचे लोक पोडियंकुलम गावात कुठलीही बस थांबू देत नाही. शाळा-कॉलेजला जाणाऱ्या सर्वच मुला-मुलींना मेलूर गावाच्या बस स्थानकातून गाडी पकडावी लागते. तिथेही पोडियंकुलम मुलींशी छेडछाड होते. कोणी आजारी असेल, गर्भवती स्त्री कळा सोसत गावच्या रस्त्यालगत उभी असेल, इतकंच काय तर शेवटचा घटका मोजत असलेली एखादी व्यक्ती रस्त्यालगत उभी असली तरीदेखील एकही गाडी त्यांच्यासाठी थांबत नाही. चित्रपटाच्या सुरुवातीच्या सीनमध्येच एक लहान मुलगी याच रस्त्याच्या मधोमध पाय घासत जीव सोडते. पण एकही गाडी तिच्या मदतीसाठी थांबत नाही. पुढे याच मुलीचा मुखवटा पोडियंकुलमच्या युद्धाचा चेहरा बनतो. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे युद्धदेखील सर्व्हायव्हल स्टोरी आहे. या मेलूरमधल्या सवर्णांना ते कसे मोठे आणि सामर्थ्यवान आहेत हे घोषित करायचं आहे तर पोडियंकुलमचा स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष सुरु आहे. या संघर्षात किंवा या युद्धात कर्णा (धनुष) हा पोडियंकुलमचा सेनापती बनतो.

हा चित्रपट अनेक सामाजिक बाबींना स्पर्श करतो. यामधील एका गरीब गावावार एका सधन आणि सवर्णांच्या गावाकडून अनेक अत्याचार होत आहेत. या गावात कोणीच शिकलेलं नाही. परंतु येथील तरुणांना सरकारी नोकरी हवी आहे. परंतु त्यासाठीही मोठा संघर्ष आहेच. गरीब असलं तरी गावाची स्वतःची एक संस्कृती आणि परंपरा आहेत. या गावातील लोक शीर नसलेल्या देवतेची पूजा करतात. त्या देवासाठी माशाचा बळी देतात. गावातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी, भांडणं सोडवण्यासाठी पंच आहेत. गावातील काही ज्येष्ठ आणि समजूतदार लोक पंचांचं काम करतात. त्यांच्या शब्दाला गावकरी मान देतात. चित्रपटातील प्रत्येक पात्र त्या-त्या भूमेकित परफेक्ट बसलं आहे. यासाठी दिग्दर्शकाचं कौतुक करावं लागेल.

तांत्रिकदृष्ट्या जबरदस्त चित्रपट

चित्रपटाच्या टेक्निकल बांबीचा विचार केला तर हा चित्रपट सर्वोत्तम आहे. या चित्रपटातील एक-एक फ्रेम एक-एक सिन जबरदस्त झाला. चित्रपटातील कलाकारांनी त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स दिला आहेच सोबत चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीने त्यावर चार चांद लावले आहेत. या चित्रपटातील कॅमेरावर्क तुम्हाला पहिल्या फ्रेमपासून अखेरपर्यंत जागचं हलू देणार नाही.

कलाकारांचा बेस्ट परफॉर्मन्स

या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने त्याच्या भूमिकेचं सोनं केलं आहे. कर्णा (धनुष) या चित्रपटाचा नायक असला तरी इतर कलाकारांनीदेखील दमदार काम केलं आहे. विशेषत: योगी बाबू (Vadamalaiyaan) आणि लाल (Yeman) ज्यांना धनुषनंतर बहुधा सर्वात जास्त स्क्रीन टाईम मिळाला आहे. चित्रपट संपल्यानंतर या दोघांच्याही भूमिका लक्षात राहतात. इतकंच काय तर ज्या कलाकारांना काही मिनिटांचा स्क्रीन टाईम आहे किंवा ते एक-दोन सीनमध्येच दिसत असलेल तरी त्यांचं काम धनुषपेक्षा कमी नाही. हा चित्रपट एकट्या धनुषचा बिलकुल नाही. या चित्रपटातलं प्रत्येक पात्र या चित्रपटाचे नायक आहेत.

मारी सेल्वराजचा मास्टरपीस

कर्णाला सैन्यात भरती व्हायचं आहे. त्याचे कुटुंबदेखील यासाठी होईल तितकी कर्णाची मदत करत आहेत. त्याने सैन्यात भरती व्हावं, हे त्याच्या घरातील आणि गावातील प्रत्येकाचं स्वप्न आहे. तसंच कर्णालादेखील सैन्यात भरती होऊन त्याच्या घरची आणि गावाची परिस्थिती बदलायची आहे. परंतु दुसऱ्या बाजूला त्याचं, त्याच्या गावाचं शोषण सुरु आहे. त्याची त्याला प्रचंड चिड आहे. प्रत्येक पावला पावलावर होणाऱ्या अन्यायाविरोधात तो आवाज उठवतो. परंतु त्याच्याच गावातील गावकरी त्याला शांत करतात, अनेकदा त्याला बोल लावतात, त्याला गावातून बेदखल करण्याची भाषादेखील करतात. कारण त्यांना अन्याय सहन करण्याची सवय झाली आहे. हे चित्र कधीच बदलणार नाही, अशीच त्यांची धारणा आहे. कर्णाच्या आत एक ज्वाला भडकलीय, पण तो त्याचा उद्रेक होऊ देत नाही. त्याच्या आत सुरु असलेलं युद्ध त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या डोळ्यात सतत दिसत राहतं. धनुषचा अभिनय अनेक फ्रेममध्ये कोणत्याही डायलॉगशिवाय गोष्टीला पुढे नेत राहतो.

चित्रपटातील प्राण्यांचा उपयोग

या चित्रपटातील प्राण्यांच्या भूमिकादेखील खूप महत्त्वाच्या आहेत. दिग्दर्शकानं अत्यंत खूबीने यात प्राण्यांचा वापर केला आहे. कर्णा आतून पेटलाय, कधीही त्याचा उद्रेक होईल आणि या आगीत मेलूरमधले सत्ताधारी त्यात भस्म होतील असं वाटतं राहतं. त्याला मुक्त व्हायचंय, बंड करायचंय, परंतु गावकरी त्याला, त्याच्या विचारांना दाबत राहतात. कर्णाची परिस्थिती किंवा त्याची मनस्थिती दर्शवण्यासाठी या चित्रपटात दिग्दर्शकानं पुढचे दोन पाय बांधलेलं गाढव दाखवलंय. त्या गाढवाला धावायचंय, मुक्त व्हायचंय पण त्याला मुक्त होता येत नाही. पाय बांधल्यामुळे संथगतीनं चालणारं गाढव कर्णाची मनस्थिती अचूकपणे दर्शवते. कर्णालाही धावायचंय, पण तिथली सामाजिक व्यवस्था त्याला ते करू देत नाही. या चित्रपटात गाढवासह घार, हत्ती, घोडा, कोंबडीची पिल्लं, मासा आणि कुत्रा असे अनेक प्राणी-पक्षी पाहायला मिळतील. ही जनावरंदेखील या चित्रपटाची कथा पुढे नेण्याचं काम करतात. या प्राण्यांचे अनेक सीन्स चित्रपटाच्या मूळ विषयाला हात घालतात. दिग्दर्शकाने या चित्रपटात प्राण्यांसह अनेक निर्जीव वस्तूंचा खूबीनं वापर केला आहे. चित्रपटातील प्रत्येक फ्रेममध्ये दिसणाऱ्या वस्तू, प्राणी सिम्बॉलिक आहेत. ते सतत या चित्रपटाच्या मूळ विषयाला हात घालत राहतात. सुरुवातीपासून अखेपर्यंत दिग्दर्शकाची कथेवरील पकड कुठेही सैल झालेली नाही. अनेकदा या सिम्बॉलिक वस्तू ती पकड अजून मजबूत करतात.

यासह या चित्रपटात एक निर्जीव मुखवटादेखील पाहायला मिळतो. हा मुखवटादेखील या चित्रपटाच्या कथेचा भाग आहे. कर्णाच्या आत असलेल्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो का? कर्णा त्या गाढवाला मुक्त करतो का? तो सैन्यात भरती होतो का? गावची परिस्थिती बदलते का? या सर्व्हायव्हल स्टोरीत पोडियंकुलम गाव सर्व्हायव्ह करतं का, कि पुन्हा एकदा सवर्ण, सत्ताधारी लोक पोडियंकुलममधल्या मागासवर्गीयांना आपल्या पायांखाली चिरडतात? अशा अनेक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला कर्णन पाहिल्यावर मिळतील. हा चित्रपट अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हा चित्रपट केवळ तमिळ भाषेत उपलब्ध आहे. परंतु तुम्ही हा चित्रपट इंग्रजी सबटायटलसह पाहू शकता.

इतर बातम्या

7 Kadam Review : रोनित रॉय-अमित साधचा प्रभावहीन स्पोर्ट्स ड्रामा

Drishyam 2 Movie Review : ‘पटकथेतल्या कथेचा बाप खेळ’, दृश्यम 2 कसा आहे?

(Karnan Movie Review Marathi : Mari Selvaraj’s Masterpiece and Dhanush Outstanding Performances)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.