अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) नुकतंच पान मसाला ब्रँडची जाहिरात केल्याने प्रचंड ट्रोल करण्यात आलं. या ट्रोलिंगनंतर अखेर अक्षयने माघार घेत चाहत्यांची माफी मागितली आणि त्या जाहिरातीतून माघार घेतली. आता अक्षयनंतर ‘केजीएफ: चाप्टर 2’चा (KGF 2) अभिनेता यशलाही (Yash) पान मसाला ब्रँडसाठी कोट्यवधी रुपयांच्या एंडोर्समेंट डीलची ऑफर देण्यात आली. मात्र यशने या ऑफरला साफ नकार दिला. यशच्या ‘केजीएफ 2’ला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळत असताना त्याला कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीची ऑफर देण्यात आली. मात्र यशने या कोट्यवधींच्या डीलला नकार दिला. यशसाठी एंडोर्समेंट डील हाताळणाऱ्या एक्सीड एंटरटेन्मेंट एजन्सीने याबाबतची माहिती दिली.
टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे प्रमुख अर्जुन बॅनर्जी यांनी सांगितलं, “मला आठवतंय की मार्च 2020 मध्ये आम्ही यश आणि त्याचा मित्र, सहकारी प्रशांत यांच्यासोबत एक टीम बनवली आणि संपर्कासाठी आम्ही एक अनौपचारिक ग्रुप तयार केला होता. ‘वादळ येत आहे’ असं नाव त्या ग्रुपला देण्यात आलं होतं. हाच विश्वास त्याने आमच्यात रुजवला आहे. KGF 2 चं शूटिंग जेव्हा पूर्ण होईल आणि तो प्रदर्शित होईल तेव्हा त्याला इतका प्रतिसाद मिळेल हे कोणालाच माहीत नव्हतं”
“सध्या आम्ही एक टीम म्हणून दीर्घकालीन पार्टनरशिप्सकडे पाहतोय. अलीकडेच आम्ही एका पान मसाला ब्रँडची कोट्यवधींची ऑफर नाकारली. आम्ही कोणाशी संबंधित डील करतो याविषयी अत्यंत सावधगिरी बाळगणार आहोत. देशभरात असलेली त्याची लोकप्रियता पाहता त्याचे चाहते आणि फॉलोअर्सपर्यंत योग्य संदेश पोहोचवता येईल अशाच ब्रँडमध्ये आम्ही आमचा वेळ आणि मेहनत यांची गुंतवणूक करू इच्छितो. पान मसाला आणि त्यासारख्या इतर उत्पादनांचा लोकांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होतो आणि त्यांचा परिणाम जीवघेणा ठरू शकतो. यशने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे,” असं ते पुढे म्हणाले.
नुकतीच अक्षय कुमारने तंबाखूची जाहिरात केली होती आणि त्यामुळेच त्याचे चाहते नाराज झाले होते. नेटकऱ्यांनी या जाहिरातीमुळे अक्षयला खूप ट्रोल केलं होतं. विरोधानंतर अक्षयने जाहिरातीतून माघार घेत चाहत्यांची माफी मागितली. त्याचसोबतच जाहिरातीतून मिळालेला पैसा हा चांगल्या कामासाठी खर्च करणार असल्याचं सांगितलं.