एकनाथ शिंदेंवर विनोद केलेला कुणाल कामरा एका शोमधून किती कमावतो? नेटवर्थ किती?
कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विनोदाने वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या स्टुडिओची तोडफोड झाली आणि एफआयआर दाखल झाला. पण कुणाल कामरा कॉमेडी शोमधून नेमके किती पैसे कमावतो. त्याची नेटवर्थ किती आहे?

रविवारी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान कॉमेडियन कुणाल कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करून वाद निर्माण केला. या घटनेवर शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि त्यांच्या स्टुडिओची तोडफोड केली. त्याच्या स्टँड-अप शो दरम्यान, कामराने ‘दिल तो पागल है’ मधील एका गाण्याचे विडंबन केले आणि शिंदे यांना ‘गद्दार’ म्हटलं आहे.
कुणाल वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही
त्याच्या विनोदी शैलीत तो म्हणाला, ‘जर तुम्ही माझ्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते (एकनाथ शिंदे) गद्दार दिसले… हाय…हाय.’ या घटनेनंतर सगळेच या विषयावर बोलत आहेत. तथापि, कुणाल वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अनेक विनोदांवरून तो वादात अडकला आहे.पण कुणाल कामरा कोण आहे, तो नक्की काय करतो आणि तो एका शोमधून किती कमावतो. त्याचं नेटवर्थ काय आहे ते पाहुयात.
शिक्षण आणि कॉमेडीअन म्हणून पहिलं पाऊल
कुणाल कामराचा जन्म 3 ऑक्टोबर 1988 रोजी झाला आणि तो व्यवसायाने एक भारतीय स्टँड-अप कॉमेडियन आहे. जो जीवनातील विचित्र गोष्टींवर विनोद करतो. राजकारण, कॅब ड्रायव्हर्स, बॅचलर लाईफ आणि टीव्ही जाहिरातींवरील विनोद हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध सादरीकरण आहेत. कुणालने वाणिज्य शाखेत पदवी मिळविण्यासाठी जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याने दुसऱ्या वर्षातच शाळा सोडली आणि प्रसून पांडेच्या जाहिरात चित्रपट निर्मिती संस्थेत कॉर्कोइस फिल्म्समध्ये निर्मिती सहाय्यक म्हणून काम केले आणि 11 वर्ष तिथे काम केलं.
2013 मध्ये मुंबईतील कॅनव्हास लाफ क्लबमध्ये एका कार्यक्रमाद्वारे त्याने स्टँड-अप कॉमेडियन म्हणून सुरुवात केली. 2017 मध्ये, त्याच्या एका शोची क्लिप YouTube वर अपलोड झाल्यामुळे त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. जुलै 2017 मध्ये त्याने रमित वर्मासोबत ‘शट अप या कुणाल’ हा टॉक-शो सुरू केला. कुणाल त्याच्या विनोदाने या आधाही अशाच पद्धतीने अनेकदा वादात अडकला आहे.
कुणाल कामरा यांची एकूण संपत्ती
कुणाल कामराच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर, त्याची एकूण संपत्ती सुमारे 2 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 17 कोटी रुपये आहे. ही एकूण संपत्ती त्याच्या विनोदी उद्योगातील यशामुळे आहे. त्याची एकूण नेटवर्थ स्टँड-अप कॉमेडी टूर्स, सोशल मीडिया आणि ‘शट अप या कुणाल’ पॉडकास्टमधून येते. कुणाल कामरा एका शोसाठी 3 ते 4 लाख रुपये घेतो. तसेच तो कॉमेडी शोच्या माध्यमातून महिन्याला 12 ते 15 लाख रुपये कमावतो.
कुणाल कामरा विरोधात एफआयआर दाखल
कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि शिवसेना कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्टुडिओत येऊन तोडफोड केली. कुणाल कामराच्या स्टुडिओबाहेरही निदर्शने झाली. ज्या हॉटेलमध्ये त्याने शिंदे यांना टोमणे मारले होते, त्या हॉटेलची तोडफोड करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणालविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.