“मी माझ्या पलंगाखाली लपून बसणाऱ्यातला नाही…” कुणाल कामराचं थेट शिंदेंनाच आव्हान तर पोलिसांवरही प्रश्नचिन्ह
कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विनोदाच्या टीकेमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध केला होता. तसेच कामराचे अनेक स्टेटमेंटही समोर येत आहेत. आता कामराचे दिलेलं अजून एक स्टेटमेंट चर्चेत आहे. "मी माझ्या पलंगाखाली लपून बसणाऱ्यातला नाही..." असं म्हणत त्याने येणाऱ्या परिस्थितीतला घाबरणार नसल्याचं म्हटलं आहे.

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनोदातून टीका केली होती. ज्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी जोरदार निषेध केला. रविवारी शोची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद आणखी वाढला. यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हॅबिटॅट क्लबची तोडफोड केली. या प्रकरणात पोलिसांनी 12 जणांना अटक केली, ज्यांना सोमवारी जामीन मिळाला. तसेच, शिवसेनेच्या 40 कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला.
“माझ्या घरात पलंगाखाली लपून…”
दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी कुणालने माफी मागवी अशी मागणी केली आहे. याबाबत त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्याचं मत पोस्टही केलं होतं. माफी मागणार नाही असं म्हणत त्याने तेव्हाच हे स्पष्ट केलं होतं. आता कामराने दिलेली प्रतिक्रिया पुन्हा एकदा समोर आली आहे. “गर्दीला मी घाबरत नाही आणि माझ्या घरात पलंगाखाली लपून हे सगळं संपण्याची वाट मी पाहणार नाही.” असं त्याने म्हटलं आहे.
पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं
एवढंच नाही तर त्याने पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तो म्हणाला आहे की.” मी पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करायला तयार असल्याचं आधीच कबूल केलं आहे. पण मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की, तोडफोड करणाऱ्यांवर कायदा समान रीतीने लागू केला जाईल का? याची शाश्वती पोलीस देणार का? असं म्हणत त्याने एकंदरितच पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळे आता त्याच्या समोर येत असलेल्या एक एक नवीन प्रतिक्रियांमुळे तो थेट शिंदेंनाच आवाहन करत असल्याचं दिसत आहे.
कामराचे कॉल रेकॉर्ड आणि बँक स्टेटमेंट तपासले जातील
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामराने त्याच्या विधानाबद्दल माफी मागावी अशी मागणी करत आहेत. ते म्हणाले, ‘एकनाथ शिंदेजींचा अपमान करण्यात आला आहे, तसा प्रयत्न करण्यात आला आहे. ते सहन केलं जाणार नाही. इतक्या मोठ्या नेत्याला गद्दार म्हणण्याचा अधिकार कोणत्याही स्टँड-अप कॉमेडियनला नाही. कामराने माफी मागावी” अशी मागणी केली आहे. दरम्यान गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत घोषणा केली की ‘यामागे कोण आहे’ हे शोधण्यासाठी कामराचे कॉल रेकॉर्ड आणि बँक स्टेटमेंट तपासले जातील.
उद्धव ठाकरेंकडून कामराचे समर्थन
उद्धव ठाकरे यांनी मात्र कामरा याच्या विधानाचे समर्थन केले आहे. ‘कुणाल कामराने काही चुकीचे म्हटले आहे असे मला वाटत नाही. देशद्रोह्याला देशद्रोही म्हणणे म्हणजे कोणावरही हल्ला नाही. पूर्ण गाणं ऐका आणि इतरांनाही ऐकायला लावा. या हल्ल्याशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही, आणि तसेही ते कधीच खरे शिवसैनिक असू शकत नाही” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कामराचे समर्थन केलं आहे.