आज्या-शितली निरोप घेणार, ‘लागिरं झालं जी’ मालिकेचा शेवटचा भाग ठरला!
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ‘लागिरं झालं जी’ मालिकेचा चाहता महाराष्ट्रातील घराघरात आहे. आज्या आणि शितलीची प्रेमकहाणी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ‘लागिरं झालं जी’ मालिकेचा चाहता महाराष्ट्रातील घराघरात आहे. आज्या आणि शितलीची प्रेमकहाणी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. चांदवडी हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचलं. मालिकेतील आपले लाडके कलाकार आज्या, शितली, राहुल्या, भैय्यासाहेब यांची एक झलक बघण्यासाठी गावात गर्दी होऊ लागली. पण आता लागिरं झालं जीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या 22 जून रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या मालिकेच्या जागी मिसेस मुख्यमंत्री ही नवी मालिका सुरु होणार आहे.
लष्करात असलेला आज्या आणि साधीसरळ शितली यांच्यात उमलणारी हळूवार प्रेमकथा महाराष्ट्रातील रसिकांनी चांगलीच डोक्यावर घेतली. त्यानंतर आज्या आणि शितलीचा विवाहसोहळा संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला. जणू आपल्याच घरचं लग्न असल्याप्रमाणे सगळ्यांनी ते सेलिब्रेट केलं.
अभिनेत्री शिवानी बावकर, नितिश चव्हाण, राहुल मगदूम, निखिल चव्हाण हे सगळे कलाकार या मालिकेमुळे चांगलेच प्रकाशझोतात आले. महत्त्वाचे म्हणजे या मालिकेमुळे चांदवडी या पुनर्वसित गावातील लोकांना रोजगार मिळाला. गाव प्रकाशझोतात आले. पण अडीच वर्षांपूर्वी सुरु झालेला हा संस्मरणीय प्रवास अखेर थांबतोय. मालिकेचा शेवट कसा होणार याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे. आपल्या लाडक्या आज्या-शितलीला प्रेक्षक मिस करतील हे मात्र नक्की!
संबंधित बातम्या