‘लागीरं झालं जी’ फेम नितीश चव्हाणचं दमदार कमबॅक; साकारणार जबरदस्त भूमिका

| Updated on: May 12, 2024 | 11:08 AM

'लागीरं झालं जी' या गाजलेल्या मालिकेत भूमिका साकारलेला अभिनेता नितीश चव्हाण झी मराठी वाहिनीवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'लाखात एक आमचा दादा' या नव्या मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लागीरं झालं जी फेम नितीश चव्हाणचं दमदार कमबॅक; साकारणार जबरदस्त भूमिका
Nitish Chavan
Image Credit source: Instagram
Follow us on

सूर्यादादा.. चार बहिणींचा भाऊ, स्वभावाने भोळसट, करारी मर्द, करड्या शिस्तीचा मात्र बहिणींच्या सुखासाठी, त्यांच्या रक्षणासाठी आणि त्यांची लग्न उत्तमोत्तम घरात लागावीत यासाठी दिवस रात्र जीवाचे रान करणारा लाखात एक असा भाऊ. मोठ्या दिलाचा राजामाणूस! या सूर्यादादाला चार बहिणी आहेत. तेजू, धनु, राजू, भाग्या. तेजश्री एका शाळेत शिक्षिका आहे. तिला लहान मुलांचं प्रचंड वेड आहे आणि आयुष्याबद्दल ती प्रचंड आशावादी आहे. दुसरी बहिण धनश्री हिला सतत काहीतरी खायला लागतं. अंगाने जाड असल्याने सूर्याला तिच्या लग्नाची काळजी आहे. धनुचं इंग्रजी विषयाशी वाकडं आहे. ती इंग्रजी पास होण्याची वाट सूर्याच नाही तर सगळं गाव पाहतंय. सूर्याची तिसरी बहिण राजश्री घरात लहान असूनही घराची काळजी घेणं, रखरखाव करणं, हिशोब करणं यात ती हुशार आहे. एकप्रकारे ती या घराची फायनान्स मिनिस्टरच आहे. राजश्री शिकलेली नाही पण व्ययहारात चोख आहे. चौथी बहिण भाग्यश्री ही अजूनही शाळेत शिकते. तिला गाणं शिकायचं आहे. अशा या अतरंगी बहिणींचा सूर्या दादा आहे.

लहानपणीच आई घर सोडून पळून गेली. म्हणून सूर्या चारही बहिणींची आई झाला. प्रचंड शिस्तीने त्याने बहिणींना वाढवलं आहे. जेणेकरून उद्या कुणी तोंड वर करून असं बोलायला नको की आईविना वाढलेल्या मुली वाया गेल्या. चार बहिणींचंही सूर्यावर प्रचंड प्रेम आहे. सूर्याची स्वतःसाठी काहीच स्वप्न नाहीत. त्याने त्याचं बालपणीचं प्रेम ही त्याच्या मनातच ठेवलं आहे. सूर्याचं प्रेम तुळजावर आहे आणि ती मात्र या सगळ्यापासून अजाण आहे. पुढे तुळजा शिकायला म्हणून शहरात गेली आणि घरच्या परिस्थितीमुळे सूर्याने त्याचं स्वप्न उरात कुठेतरी दाबून टाकलं.

हे सुद्धा वाचा

एक साधा किराणा दुकानदार असूनसुद्धा प्रचंड हिशोबी असलेल्या या सूर्या आणि त्याच्या चार बहिणींची गोड, साधी पण सुंदर गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे या मालिकेच्या निमित्ताने ‘लागीर झालं जी’ नंतर नितीश चव्हाण पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर कमबॅक करत आहे. या मालिकेचं लेखन स्वप्नील चव्हाण आणि विशाल कदम यांनी केलंय. तर मालिकेचे दिग्दर्शक किरण दळवी आहेत. ‘वज्र प्रॉडक्शन’ या मालिकेची निर्मिती करणार आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ असं या मालिकेचं नाव असून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.