Tunisha Sharma Death : अभिनेत्री तुनिशा शर्माने (tunisha sharma ) बॉयफ्रेंड शीजान खानच्या (Sheezan Mohammed Khan) मेकअप रुममध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्यामुळे फक्त टीव्ही विश्वातच नाही, तर सर्वत्र खळबळ माजली आहे. तुनिशाच्या जीवनात असं काय झालं होतं, ज्यामुळे अभिनेत्रीने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी शीजानला चार दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी अभिनेत्री आत्महत्या केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. आता याप्रकरणी रोज नवीन खुलासे समोर येत आहेत.
तुनिशा शनिवारी सकाळी उत्साहात मालिकेच्या सेटवर पोहोचली होती. पहिली शिफ्ट संपवल्यानंतर शीजान आणि तुनिशाने दुपारी तीन वाजता एकत्र जेवण देखील केलं. पण त्या 15 मिनिटांमध्ये असं काय झालं, ज्यामुळे तुनिशाने 03:15 मिनिटांनी गळफास लावून आयुष्य संपवलं. या गोष्टीचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
पोलिसांनी तुनिशा आणि शाजान दोघांचे फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहे. ज्यामुळे दोघांमध्ये झालेले कॉल आणि चॅट रिट्रिव्ह करता येतील. ज्यामुळे त्या 15 मिनिटांमध्ये तुनिशा आणि शीजानमध्ये नक्की काय झालं कळू शकेल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 महिन्यांपूर्वी तुनिशा शीजनसोबत आनंदात होती, अशी माहिती अभिनेत्रीच्या आईने दिली आहे. पण 15 दिवसांपूर्वी ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री प्रचंड तणावात होती. तुनिशाच्या आईच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्रीच्या मृत्यूसाठी शीजान जबाबदार आहे.
दरम्यान, ब्रेकअपनंतर तुनिशाला पॅनिक अटॅक देखील आला होता. जेव्हा अभिनेत्रीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, तेव्हा डॉक्टरांनी तिची विशेष काळजी घेण्यासाठी सांगितलं होतं. अभिनेत्रीला कोणत्याही प्रकारच्या तणावापासून दूर ठेवा असं देखील डॉक्टरांनी कुटुंबाला सांगितलं असल्याची माहिती अभिनेत्रीच्या आईने दिली.
घडलेल्या प्रसंगावरून शीजानच्या रुममध्ये असं काही तरी झालं असणार ज्यामुळे अभिनेत्रीने आत्महत्या केली, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. म्हणून पोलिसांनी सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
मुंबई पोलीस एसपी चंद्रकांत यांनी सांगितल्यानुसार, तुनिशा आणि शीजान दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्रीने बॉयफ्रेंडच्या मेकअप रुममध्ये आत्महत्या केल्यामुळे अनेत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
तुनिशाचं बॉलिवूडमध्ये (bollywood) पदार्पण
तुनिशाने फक्त मालिकांमध्येच नाही, तर सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तुनिषाने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं आहे. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंह’ आणि ‘दबंग 3′ या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.