मुंबई : ‘रोजा’, ‘जालिम’, ‘योद्धा’ यांसारख्या बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री मधू सध्या इंडस्ट्रीपासून दूर आहे. नव्वदच्या दशकातील ती सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री होती. मात्र तिने चित्रपटातील करिअर का सोडलं, या प्रश्नाचं उत्तर कोणीच सांगू शकलं नाही. आता बऱ्याच वर्षांनंतर खुद्द मधूने इंडस्ट्री सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मधू फिल्म इंडस्ट्री स्त्री-पुरुषांमध्ये केल्या जाणाऱ्या भेदभादाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींना ठराविक वयानंतर योग्य भूमिका मिळणं अवघड असल्याचं तिने म्हटलंय.
या मुलाखतीत मधूने सांगितलं की तिला मोठ्या पडद्यावर अजय देवगणच्या आईची भूमिका साकारण्यात अजिबात रस नव्हता. या दोघांनी एकत्र इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. 1991 मध्ये या दोघांचा ‘फूल और कांटे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि दोघांचं वयसुद्धा जवळपास एकच होतं. याविषयी मधू म्हणाली, “मी रोजा, अनाया आणि योद्धा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळल्यानंतर मी मुंबईत राहू लागले. त्यावेळी मी अधिकाधिक हिंदी चित्रपट करू लागले. मी अशा चित्रपटांचा भाग होते, ज्यामध्ये अॅक्शन हिरो मुख्य भूमिकेत होते. नव्वदच्या दशकातील चित्रपट कसे होते हे तुम्हाला माहीत असेलच. मी तक्रार करत नाहीये. पण रोजा चित्रपट केल्यानंतर तशा भूमिका साकारण्याबद्दल मी नाखुश होते. जेव्हा शूटिंगच्या तारखा यायच्या, तेव्हा मी खरंच निराश व्हायचे. तेव्हाच मी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी सर्वांना पत्र लिहून कळवलं होतं. त्यामागचा उद्देश हाच होता की तुम्ही सर्वजण माझ्या लायक नाही. तो त्या वयातील राग होता. पण नंतर मला माझ्या कलेची जाणीव झाली आणि मी इंडस्ट्रीत परतले.”
वाढत्या वयाबद्दल मधू पुढे म्हणाली, “वय वाढणं हा एक विशेषाधिकार आहे. जर तुम्हाला वाढत्या वयाची भीती वाटत असेल तर तुम्ही मराल. कोणाला मरायचं आहे? आपण दीर्घायुष्यासाठी योग करत आहोत. जर तुमचं वय वाढलं असेल तर तुम्ही 20 वर्षांच्या मुलीसारखं कसं दिसू शकाल? तरुण दिसण्याची नाही तर तारुण्य अनुभवण्याची ही गोष्ट आहे. पण जर हाच विचार मी चित्रपटांच्या बाबतीत केला तर भूमिका मिळवणं कठीण असतं. कारण मला अजय देवगणच्या आईची भूमिका साकारायची नव्हती. आम्ही दोघं एकत्र या इंडस्ट्रीत लाँच झालो होतो. आम्ही एकाच वयाचे आहोत. सुदैवाने आता परिस्थिती हळूहळू बदलत आहे. कारण तब्बू आणि अजयने एकाच चित्रपटात काम केलं आहे. ते दोघंही एकाच वयाचे आहेत. म्हणूनच इंडस्ट्रीत झालेल्या या बदलाबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे.