अभिनेत्री रवीना टंडनच्या अडचणी वाढल्या, त्या व्हिडीओ संदर्भात चौकशीचे आदेश
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. तिच्याविरुद्ध तपास करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. रोड रोजच्या घटनेप्रकरणी अभिनेत्रीविरोधात हा आदेश देण्यात आला आहे.
अभिनेत्री रवीन टंडन हिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्ते मोहसीन शेख यांच्या तक्रारीवरून रवीना विरुद्ध तपास करण्याचे निर्देश बोरिवली मजिस्ट्रेट कोर्टाने सोमवारी मुंबई पोलिसांना दिले. 3 जानेवारी2025 पर्यंत याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 मार्च 2025 रोजी होणार आहे. अभिनेत्री रवीना टंडनच्या चालकाने बेदरकारपणे गाडी चालवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता. मात्र तो काढून टाकण्यासाठी संबंधित व्यक्तीवर दबाव टाकल्याचा आरोप रवीनावर लावण्यात आला आहे.
रवीना टंडनकडून अनेक बड्या व्यक्तींच्या माध्यमातून मोहसिन शेख या सामाजिक कार्यकर्त्यावर व्हिडिओ हटवण्यास दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोहसीन शेख यांनी आपल्या तक्रारीत अभिनेत्रीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (बदनामी) आणि कलम 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. रवीना टंडनच्या कथित रोड रेज घटनेचा व्हिडिओ मोहसीन शेखने त्याच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला होता. मात्र तो व्हिडिओ शेअर केल्यानंतर, रवीनाशी संबंधित अनेक प्रभावशाली व्यक्तींसह राजकारण्यांनी व्हिडिओ काढून टाकण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला, असा दावा शेखने केला आहे.
काय आहेत आरोप ?
आपल्यावर खंडणीचे खोटे आरोप लावण्यात आल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. समाजात त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या वर्षी जूनमध्ये रवीनाचा ड्रायव्हर वांद्रे येथील एका सोसायटीमध्ये कार रिव्हर्स घेत होता. तेव्हा रस्त्याने चालत असलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांनी त्याला रोखले. कार रिव्हर्स घेण्यापूर्वी मागे लोक आहेत का ते तपासावे, असे त्यांनी त्या ड्रायव्हरला सांगितले. त्यानंतर रीवानाचा कारचालक आणि ती माणसं यांच्यात बराच वाद झाला होता. रवीनाने मध्ये पडण्याचा प्रयत्न केला असता, तिच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
काय आहे प्रकरण ?
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्या रवीना टंडनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात रवीना टंडन हिला काही लोकांनी घेरलं होतं. मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीने रवीनावर गंभीर आरोप केला. रवीना दारुच्या नशेत होती. आणि दारुच्या नशेतच तिने माझ्या आईला मारहाण केली, असा आरोप या व्यक्तीने केला आहे. तसेच रवीनाच्या ड्रायव्हरने त्याची गाडी माझ्या आईच्या अंगावर चढवली, असा गंभीर आरोपही त्याने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेची बरीच चर्चा सुरू होती. मात्र पोलिसांनी तपास केला असता अभिनेत्री रवीना टंडनच्या कारने कोणालाच टक्कर दिली नाही, हे त्यातून समोर आले.