हे सहन करण्यापलीकडचं.. संतापलेल्या मलायकाने एकनाथ शिंदेंकडे केली कारवाईची मागणी

| Updated on: Feb 14, 2024 | 2:17 PM

ठाण्यातल्या 'वेटिक' क्लिनिकमधील संतापजनक प्रकरणाविषयी पोस्ट लिहित अभिनेत्री मलायका अरोराने कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग करत मलायकाने या घटनेकडे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. याप्रकरणी रितेश देशमुख आणि जुई गडकरी यांनीही संताप व्यक्त केला आहे.

हे सहन करण्यापलीकडचं.. संतापलेल्या मलायकाने एकनाथ शिंदेंकडे केली कारवाईची मागणी
Malaika Arora and Eknath Shinde
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 14 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री मलायका अरोराने एका प्रकरणात संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी तिने थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागितली आहे. हे सर्व सहन करण्यापलीकडचं आहे, असंही तिने म्हटलंय. प्रशासनाने याप्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मलायकाने केली आहे. मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील स्टोरीमध्ये हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ठाण्यातील एका पाळीव प्राण्यांच्या क्लिनिकमध्ये श्वानांना मारहाण होत असल्याचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओवर मलायकासह अभिनेता रितेश देशमुख आणि जुई गडकरी यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. ठाण्यातील आर. मॉलजवळ असलेल्या वेटिक पेट क्लिनिकमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पाळीव प्राण्यांच्या या क्लिनिकमध्ये ग्रुमिंगसाठी आणलेल्या एका श्वानाला क्लिनिकमधील दोन कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर अनेकांकडून संताप व्यक्त केला जातोय. ही घटना 7 ते 8 फेब्रुवारीची असल्याचं म्हटलं जातंय. श्वानाला मारहाण करणाऱ्यांवर आणि संबंधित क्लिनिकवरही कडक कारवाई करावी, अशी मागणी मलायकाने केली आहे. मलायकाने संबंधित क्लिनिकचा फोटोसुद्धा शेअर केला आहे. ‘अशा पद्धतीच्या वागणुकीबद्दल तुम्हाला सर्वांना स्पष्टीकरण द्यावंच लागेल. आम्हाला या व्यक्तीचं नाव हवंय. तो असा करूच कसा शकतो’, असाही सवाल मलायकाने केला आहे.

मलायकाची पोस्ट

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर बराच संताप व्यक्त झाल्यानंतर आणि या व्हिडीओवर सेलिब्रिटींकडूनही आक्षेप घेण्यात आल्यानंतर अखेर मुंबई पोलिसांनी श्वानाला मारणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. त्याचाही व्हिडीओ मलायकाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. अभिनेता रितेश देशमुखनेही व्हिडीओ शेअर करत कर्मचाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली होती. तर अभिनेत्री जुई गडकरीनेही हा प्रकार संतापजनक असल्याचं म्हटलंय.

रितेश देशमुख आणि जुई गडकरीची पोस्ट-

“मी तो व्हिडीओ पूर्ण पाहूच शकले नाही. श्वानाला मारणाऱ्याला देव नक्कीच शिक्षा देईल. आपल्या श्वानाला अशाप्रकारे क्लिनिकमध्ये एकटं पाठवू नका”, असं आवाहन जुईने नेटकऱ्यांना केलंय. अनेक प्राणिप्रेमींनी या घटनेप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली.