मुंबई: ‘सोनी मॅक्स’ वाहिनीवर सतत प्रसारित होणारा अमिताभ बच्चन यांचा ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट प्रत्येकाने किमान एकदा तरी नक्कीच पाहिला असेल. गेल्या कित्येत वर्षांपासून हा चित्रपट या वाहिनीवर वारंवार दाखवला जातो. त्यावरून सोशल मीडियावर अनेक मीम्ससुद्धा व्हायरल झाले आहेत. सोनी मॅक्सवर हा चित्रपट इतक्या वेळा का दाखवला जातो, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याचं उत्तर म्हणजे या वाहिनीने सूर्यवंशम या चित्रपटाचे तब्बल 100 वर्षांचे राइट्स विकत घेतले आहेत. त्यामुळे हा करार पूर्ण होईपर्यंत सोनी मॅक्सवर सतत ‘सूर्यवंशम’ प्रसारित केला जाणार आहे. वारंवार हा चित्रपट पाहून वैतागलेल्या एका प्रेक्षकाने अखेर वाहिनीलाच पत्र लिहिलं आहे. या पत्राची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
“मला मान्य आहे की तुमच्या चॅनलला सूर्यवंशम चित्रपटाच्या टेलिकास्टचा ठेका मिळाला आहे. तुमच्या कृपेने मी आणि माझे कुटुंबीय हे हिरा आणि त्याच्या कुटुंबीयांना (राधा, गौरी आणि इतर..) चांगलेच ओळखतात. मला हे जाणून घ्यायचं आहे की आतापर्यंत तुमच्या चॅनलने हा चित्रपट किती वेळा प्रसारित केला? भविष्यात आणखी किती वेळा तो दाखवला जाईल? जर आमच्या मानसिक आरोग्यावर त्याचा काही विपरित परिणाम झाला, तर त्याला कोण जबाबदार असेल? कृपया उत्तर देण्याचं कष्ट करावं”, असं एका वैतागलेल्या प्रेक्षकाने सोनी मॅक्स वाहिनीला हे पत्र लिहिलं आहे.
हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडू लागला आहे. ‘तुमचं दु:ख आम्ही समजू शकतो’ असं एकाने लिहिलं. तर ‘हे पत्र त्या प्रत्येक भारतीयाकडून आहे, जो सोनी किंवा सेट मॅक्स पाहतो’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.
‘सूर्यवंशम’ हा चित्रपट 21 मे 1999 रोजी प्रदर्शित झाला होता. त्याच वर्षी ‘सेट मॅक्स’ हे चॅनल लाँच झालं होतं. आता ‘सेट मॅक्स’ हे ‘सोनी मॅक्स’ झालं आहे. सोनी मॅक्सची मार्केटिंग हेड वैशाली शर्मा हिने एका मुलाखतीत सांगितलं होतं, चॅनलने ‘सूर्यवंशम’ या चित्रपटाचे 100 वर्षांचे राईट्स विकत घेतले आहेत. त्यामुळे हा चित्रपट वाहिनीवर वारंवार दाखवला जातो.