अमिताभ बच्चन यांना टक्कर देणारा कलावंत गमावला… विक्रम गोखले यांच्या निधनानंतर नेते, अभिनेते यांची महत्त्वाची प्रतिक्रिया
विक्रम गोखले यांचं पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास निधन झाले. मागील 15 दिवसांपासून ते येथे उपचारार्थ दाखल होते.
मुंबईः ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikrama Gokhale) यांच्या निधनानंतर मराठी चित्रपट सृष्टीतून भावनिक प्रतिक्रिया येत आहेत. फक्त मराठीच (Marathi Film) नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टीवरही अभिनयाचा ठसा उमटवणारे विक्रम गोखले हे एक उत्तम अभिनेतेच नव्हे तर उत्तम मित्र, उत्तम माणूस होते. हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चन यांना टक्कर देणारा कलावंत आपण गमावला अशी प्रतिक्रिया अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी टीव्ही 9 शी बोलताना दिली. तर विक्रम गोखले यांचे जाणे मनावा चटका लावणारे आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
मनाला चटका लावणारी घटना- उद्धव ठाकरे
विक्रम गोखले गेले. विश्वास बसत नाही. काल परवपर्यंत ते तसे संपर्कात होते. अनेक विषयांवर त्यांची मते ठाम असतं.एक कसदार राजबिंडा अभिनेते म्हणून चित्रपट रंगभूमी त्यांनी गाजवली. स्पष्ट संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य. हिंदी सिनेसृष्टीतील तो लोकप्रिय मराठी चेहरा होता. त्यांचें जाणे चटका लावणारे आहे. मृत्यूवर मात करुन ते परत येतील असे वाटत होते.पण दुर्दैव. मी या महान अभीनेत्याला आदरांजली अर्पण करतो.
त्यांना बघूनच मोठा झालो-सयाजी शिंदे
अतिशय आवडते अभिनेते होते. मी त्यांना बघूनच मोठा झालो. त्यांच्यासोबत अनेक ठिकाणी काम केलं. टीव्हीवर, सिनेमात केलं. प्रत्येकवेळी त्यांचं मौल्यवान मार्गदर्शन लाभल्याची प्रतिक्रिया सयाजी शिंदे यांनी केली.
अमिताभ बच्चन यांना टक्कर देणारा कलावंत होता- महेश कोठारे
अनेक वर्षांपासूनचा संपर्क होता. काल त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची बातमी आली होती. पण आज अचानक ही दुःखद बातमी आल्याने धक्का बसला. त्यांचे सगळे परफॉर्मन्स आम्हाला आठवतात. त्यांनी केवळ मराठी चित्रपटसृष्टीत नाही तर हिंदी इंडस्ट्रीही गाजवली. अग्निपथमध्ये सुंदर भूमिका दिली होती. अमिताभ बच्चन यांनाही त्यांनी टक्क दिली होती. एक चांगला मित्र, माणूस गेला, त्यामुळे खूप वाईट वाटलं.
सामाजिक बांधिलकीचा हरहुन्नरी कलावंत गमावला- शरद पवार
अभिनय कौशल्य व अनोख्या संवादशैलीने केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. ५० वर्ष रंगभूमीची अविरत सेवा करत सामाजिक बांधिलकी जपणारे हरहुन्नरी कलावंत विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
निष्ठावान कलातपस्वी हरवला- सुधीर मुनगंटीवार
मराठी रंगभूमी , मराठी व हिंदी चित्रपट , मालिका अशा तिन्ही माध्यमात त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर आपले कर्तृत्व सिद्ध केले. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या विक्रम गोखले यांनी अभिनयासोबत लेखन व दिग्दर्शन देखील केले आहे. अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ज्या ज्येष्ठ अभिनेत्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर मराठी रंगभूमी समृद्ध केली त्यात विक्रम गोखले यांचे नाव अग्रणी स्थानावर घेतले जाते. या कलातपस्वी व्यक्तिमत्वाने मराठी रंगभूमी सह मराठी व हिंदी चित्रसृष्टीसह मलिका क्षेत्र देखील गाजवले . त्यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
त्यांची आदरयुक्त भीती हा अभिमानाचा विषय- चंद्रशेखर बावनकुळे
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने कलेच्या प्रांतातील एक सर्जनशील कलावंत आणि मार्गदर्शक आपल्यातून निघून गेला आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी मराठी, हिंदी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत अत्यंत आदराचे स्थान मिळविले. त्यांच्याबद्दल साऱ्यांनाच वाटत असलेली आदरयुक्त भीती हा मराठी माणसाच्या अभिमानाचा विषय होता. चित्रपट सृष्टीसारख्या मायावी जगाच्या पलीकडेही एक जग आहे आणि त्या जगातील सामान्य माणसांच्या वेदनेशी, जगण्याशी आपण एकरूप व्हायला हवे, हे मूल्य त्यांनी आयुष्यभर जोपासले. या श्रेष्ठ कलावंत, विचारवंताच्या नसण्याची ही उणीव नेहमी जाणवत राहणार आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
सिनेसृष्टीतलं चालतं-बोलतं विद्यापीठ हरपलं- चंद्रकांत पाटील
ज्येष्ठ संवेदनशील अभिनेते विक्रम गोखले यांच्या जाण्याने मराठी नाट्य, सिनेसृष्टीतील चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली.