“खालच्या पातळीला जाऊन…”, अक्षय खन्नाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ट्रोल होणाऱ्या संतोषला अभिनेत्रीचा पाठिंबा
मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत संतोष जुवेकरचे नाव घेता व्हिडीओ शेअर केला आहे.

गेल्या दिवसांपासून मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर हा चर्चेत आहे. त्याने ‘छावा’ सिनेमात रायाजी ही महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण एका मुलाखतीमध्ये संतोषने चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाबाबत केलेल्या विधानामुळे ट्रोल केले जात होते. त्याने एका मुलाखतीमध्ये ‘मी अक्षय खन्नाशी बोललोच नाही’ असे म्हटले होते. त्याने या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देखील दिली होती. आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने संतोषचे नाव न घेता या ट्रोलिंगवर भूमिका मांडली आहे.
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुचिरा जाधवने संतोष जुवेकरला ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते की, “गेल्या बऱ्याच दिवसापासून मी सोशल मीडियावर एक गोष्ट बघत आहे. मला कळत नाही आपला मराठी कलाकार एक छान बॉलिवूडचा चित्रपट करतो. त्यात छान अभिनय करतो. खरंतर त्याचे ते काम आहे. ही काही वेगळी गोष्ट नाही. त्याचे काम तो करतो आणि मनापासून करतो. तो चित्रपटही आपल्याला आवडतो आणि चित्रपटानंतर प्रोटोकॉलनुसार तो काही मुलाखती देतो. ज्यात त्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांचीही तो छान उत्तरे देतो. एक नाही तर कधी कधी अनेक मुलाखती असतात, त्यामुळे सारखाच प्रश्न आणि सारखीच उत्तरे असू शकतात. त्यामुळे तो त्याचे काम करतो. सुरुवातीला त्याच्या कामाचे कौतुक होते आणि पण काही वेळाने त्या कौतुकाचे रुपांतर होते ते ट्रोल्समध्ये. ते ट्रोल्सपर्यंतसुद्धा ठीक होते.”
वाचा: ‘छावा’च्या एक दोन नव्हे, 1818 लिंक्स व्हायरल, सायबर पोलीस अॅक्शन मोडमध्ये, थेट मोठी कारवाई




पुढे ट्रोलिंगविषयी बोलताना ती म्हणाली, “मीम किंवा काही मजामस्ती म्हणून ते ठीक होतं. पण नंतर त्याची इतकी हद्द पार होते की, एकाने काही पोस्ट टाकल्यानंतर दहा जण तेच टाकतात. सलग-सलग त्याच गोष्टी येतात आणि ते बघून असे वाटते की, तुमच्याकडे इतका वेळ आहे का? जे कुणी हे सगळं करत आहेत त्यांच्याकडे इतका वेळ आहे का? की त्या एका व्यक्तीबद्दल वाईट बोलावे. असं काय एवढे केले आहे त्याने की, त्याच्याबद्दल तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाऊन बोलत आहात. कशासाठी? जगात मुद्दे नाहीत का?”
छावा सिनेमाविषयी
‘छावा’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर चित्रपटाचे दिग्दर्शन हे लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल दिसत आहे, त्यांची पत्नी येसुबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे तर औरंगजेब ही भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार देखील दिसले आहेत. त्यामध्ये संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा यांचा समावेश आहे.