संदीप रेड्डी वांगा यांना मिळाली ‘स्पिरिट’ची नायिका? मराठी अभिनेत्री करणार प्रभाससोबत पडद्यावर रोमान्स
संदीप रेड्डी वांगा यांचा आगामी चित्रपट 'स्पिरिट' मध्ये प्रभाससोबत मराठी अभिनेत्रीचा रोमान्स पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जाते. या अभिनेत्रीने बॉलिवूमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे.
‘कबीर सिंग’ आणि ‘ॲनिमल’ या दोन हिट चित्रपटांमधून संदीप रेड्डी वांगा यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आता, ते पॅन इंडियाचा स्टार प्रभासला घेऊन एक मोठा चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात बॉलिवूमध्येही आपली ओळख निर्माण करणारी मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जाते.
संदीप रेड्डी वांगा बनवणार असलेल्या चित्रपटाचे नाव ‘स्पिरिट’ असून या चित्रपटात प्रभास एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे आणि 2025 शुट सुरु होणार असल्याचेही म्हटले जाते. दरम्यान, चित्रपटाच्या स्टार कास्टच्या नवीन आणि मोठ्या अपडेटने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
प्रभाससोबत मृणाल ठाकूर दिसणार?
‘स्पिरिट’ची टीम सध्या या चित्रपटासाठी प्री-प्रॉडक्शन आणि कास्टिंग करत आहे. रिपोर्टनुसार दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि निर्माते भूषण कुमार या ॲक्शन चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्री म्हणून मृणाल ठाकूरशी चर्चा करत आहेत. मृणाल ही एक मराठी मुलगी असून तिने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
चित्रपटात करीना-सैफची जोडीही दिसणार?
‘स्पिरिट’ चित्रपटात सर्वोत्कृष्ट आणि प्रतिभावान कलाकारांचा समावेश करण्यासाठी निर्माते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यात रियल लाईफ कपल करीना कपूर खान आणि सैफ अली खान देखील दिसणार असल्याच्या बातम्या आहेत. या चित्रपटात दोघेही नकारात्मक भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.
SRV आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा चित्रपट म्हणून ‘स्पिरिट’चे वर्णन केले जात आहे. पोलिसांवर आधारित चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा त्यांचा प्रयत्न मानला जात आहे. चित्रपटात चांगली आणि वाईट पात्रे तसेच काही ग्रे कॅरेक्टरही दिसून येतील असे म्हटले जाते. आणि अशी कॅरेक्टर निवडण्यासाठीच वांगा खास करून ओळखले जातात.
चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
या चित्रपटात हर्षवर्धन रामेश्वर संगीत देत आहे, ज्यांनी संदीपच्या याआधीच्या ब्लॉकबस्टर ‘ॲनिमल’मध्ये संगीत दिले होते. ‘स्पिरिट’ची निर्मिती भद्रकाली पिक्चर्स आणि टी-सीरीज संयुक्तपणे करत आहे. ‘स्पिरिट’ 2026 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर लवकरच संदीप रेड्डी वांगा रणबीर कपूरसोबत ‘ॲनिमल पार्क’ शूट करण्यास सुरुवात करतील.