वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीची मोठी घोषणा; ‘फुलवंती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Prajakta Mali announced Fulwanti Movie : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिने एक मोठी घोषणा केली आहे. 'फुलवंती' हा तिचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कधी होणार फुलवंती सिनेमा रिलीज? वाचा सविस्तर.......

मागील काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या ‘फुलवंती’ या भव्य कलाकृतीच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. निर्माती प्राजक्ता माळी हिने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक लक्षवेधी मोशन पोस्टर शेअर करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. येत्या 11 ऑक्टोबर रोजी ‘फुलवंती’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात प्राजक्ता माळी ‘फुलवंती’च्या भूमिकेत झळकणार आहे. स्नेहल तरडे एक अभिनेत्री म्हणून सगळ्यांच्या परिचयाच्या असून ‘फुलवंती’च्या निमित्ताने त्या दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत.
प्राजक्ताने साकारली ‘फुलवंती’
नुकत्याच झळकलेल्या मोशन पोस्टरमध्ये एका सजलेल्या राजेशाही पालखीत भरजरी वस्त्रे आणि आभूषणे परिधान केलेली ‘फुलवंती’ दिमाखत बसलेली दिसत आहे. या सौंदर्यवतीच्या मोहमयी रूपाने कोणीही घायाळ होईल. पोस्टरला देण्यात आलेल्या संगीतावरून हा संगीतमय चित्रपट असल्याचा अंदाज प्रेक्षक बांधू शकतात. मुळात पहिली झलक पाहूनच ‘फुलवंती’ची भव्यता कळतेय. रसिकप्रेक्षकांसाठी सांगीतिक नजराणा असलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेसृष्टीतील आजवरची सर्वात भव्यदिव्य, अविस्मरणीय अशी कलाकृती ठरेल. ‘पद्मविभूषण दिवंगत बाबासाहेब पुरंदरे’ यांच्या ‘फुलवंती’ या कादंबरीवर हा सिनेमा आधारीत आहे.
View this post on Instagram
सिनेमाबाबत प्राजक्ता काय म्हणाली?
‘फुलवंती’ सिनेमाच्या अनाऊंसमेंटच्या दिवसाची, या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते. वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी देऊ शकले. याबद्दल देवाचे अनेक आभार… ‘फुलवंती’ माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मी निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आणि मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अनेकांनी मला विचारले की ‘फुलवंती’च का? फुलवंतीच्या कथानकाच्या मी प्रेमात पडले. साहित्य क्षेत्रातील काही दु्र्मिळ हिऱ्यांपैकी ‘फुलवंती’ एक आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या ‘फुलवंती’ या कांदंबरीवर चित्रपट व्हावा, अशी माझी मनापासून इच्छा होती, असं प्राजक्ता माळी म्हणाली.
मागील तीन वर्षांपासून अत्यंत अभ्यास करून, मेहनत घेऊन आम्ही ही भव्य ‘फुलवंती’ तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. ‘फुलवंती’मध्ये साथ लाभलेल्या पॅनोरमा स्टुडिओजच्या कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी, मंगेश पवार, अमोल जोशी, विक्रम धाकतोडे, श्वेता माळी आणि दिग्दर्शिका स्नेहल तरडे या सगळ्यांचेच मी आभार मानते. ‘फुलवंती’ आता प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. मला खात्री आहे, ही मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरची सर्वात भव्य कलाकृती ठरेल, असं म्हणत ‘फुलवंती’बद्दल प्राजक्ताने तिच्या भावना व्यक्त केल्या.