Gulhar Movie : ‘गुल्हर’ सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
शीर्षकापासूनच प्रवाहापेक्षा काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करणाऱ्या 'गुल्हर' या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं नावीन्यपूर्ण आणि सशक्त कथानक पहायला मिळणार आहे. मोशन पोस्टरपासून आजतागायत नेहमीच विविध कारणांमुळं चर्चेत राहणाऱ्या या चित्रपटाचं नवं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.
मुंबई : शीर्षकापासूनच प्रवाहापेक्षा काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘गुल्हर’ (Gulhar Movie) या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं नावीन्यपूर्ण आणि सशक्त कथानक पहायला मिळणार आहे. मोशन पोस्टरपासून आजतागायत नेहमीच विविध कारणांमुळं चर्चेत राहणाऱ्या या चित्रपटाचं नवं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. या पोस्टरवर 6 मे 2022 ही प्रदर्शनाची तारीखही घोषित करण्यात आली. ‘गुल्हर’मध्ये प्रेक्षकांना रवी काळे (Ravi Kale) आणि भार्गवी चिरमुले (Bhargavi Chirmule) या दोन आघाडीच्या कलाकारांच्या रूपात एक नवीन जोडी पहायला मिळणार आहे. शांताराम मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, अबिद सय्यद यांनी आयडियल व्हेंचरच्या बॅनरखाली ‘गुल्हर’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘गुल्हर’ या चित्रपटाच्या निमित्तानं काही वेगळे प्रयोग करण्यात आल्याचे संकेत अगदी सुरुवातीपासूनच मिळत होते. त्या सर्व अपेक्षा पूर्ण करत या चित्रपटातील रवी काळे आणि भार्गवी चिरमुले ही जोडी एका नव्या कोऱ्या पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
या चित्रपटाच्या निमित्तानं रवी आणि भार्गवी यांनी प्रथमच एकत्र काम केलं असून, पहिल्यांदाच त्यांची जोडीही जमली आहे. ही जोडी जमवण्याचं श्रेय ‘गुल्हर’चे दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांना जातं. या चित्रपटात रवी यांनी गिरीजू ही व्यक्तिरेखा साकारली असून, त्यांच्या जोडीला राधेच्या भूमिकेत भार्गवी आहे. धनगर समाजातील कुटुंबावर आधारलेलं कथानक असलेल्या ‘गुल्हर’मध्ये रवी आणि भार्गवी या दोघांचाही लुक अगदी न ओळखण्याइतपत वेगळा आहे. भाळी कुंकवाचा मळवट, काठपदराची साडी, खणाचं ब्लाऊज, हातभर हिरवा चुडा, नाकात नथणी, पायात पैंजण आणि जोडवी अशा अतिशय वेगळ्या गेटअपमधील भार्गवी रसिकांना यात दिसणार आहे. मराठीसोबतच हिंदी चित्रपटातही बऱ्याचदा नाविन्यपूर्ण भूमिकेत झळकलेले रवी यात अतिशय सामान्य व्यक्तीच्या भूमिकेत आहेत. डोक्यावर फेटा, हातात घुंगरूवाली काठी, कपाळावर हळदीचा मळवट, खांद्यावर उपरणं, गळ्यात धनगरी तावीज, सदरा, धोतर आणि वाढलेली दाढी असं काहीसं रवी यांचं रूप या चित्रपटात आहे.
नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये प्रगतीपासून लाखो कोस दूर असलेल्या, तसंच प्रतिकूल परिस्थितीतही सुखी वाटणाऱ्या कटुंबाचं चित्र पहायला मिळतं. या चित्रपटाची कथा एका ११ वर्षाच्या मुलाभोवती गुंफण्यात आली आहे. यात विनायक पोद्दार, माधव अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, शिवानी बावकर, गणेश कोकाटे, कपिल कदम, पुष्पा चौधरी, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत, स्वप्निल लांडगे, रेश्मा फडतरे, सचिन माळवदे, देवेंद्र वायाळ, गणेश शितोळे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. मोहन पडवळ यांनी या चित्रपटाची कथा लिहीली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांनी चित्रपटातील गीतांना संगीत दिले आहे. विशाल पाटील यांनी नृत्य दिग्दर्शन आहे, तर छायालेखन व संकलन कुमार डोंगरे यांनी केलं आहे. केदार दिवेकर यांनी पार्श्वसंगीत दिलं असून, निखिल लांजेकर आणि हिमांशू आंबेकर यांनी साऊंड डिझाईन केलं आहे. डिआय योगेश दीक्षित यांनी केले असून अमर लष्कर या चित्रपटाचे प्रोजेक्ट हेड अमर लष्कर आहेत. देश-विदेशातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये मानाचे समजले जाणारे पुरस्कार आपल्या नावे करणारा ‘गुल्हर’ 6 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या :
Vicky-Katrina: ‘Location तरी सांगा’; विकी-कतरिनाचे फोटो पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता
मनसे मेळाव्यात प्राजक्ता माळीची हजेरी; म्हणाली ‘जसं फिल्मफेअर जाणं गरजेचं तसंच..’
Tu Tevha Tashi: अभिनयावरील प्रेमापोटी सोडली नोकरी; रिॲलिटी शोमध्येही कमावलं नाव