मनोज जरांगेंवर आधारित ‘संघर्षयोद्धा’ सिनेमात छगन भुजबळ-गुणरत्न सदावर्तेंची भूमिका कुणी साकारली?
Manoj Jarange Patil SangharshYodhha Movie : मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात छगन भुजबळ-गुणरत्न सदावर्तेंची भूमिका कुणी साकारली? 'संघर्षयोद्धा' सिनेमा रिलीज कधी होणार? वाचा सविस्तर बातमी...
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित सिनेमा येतोय. ‘संघर्षयोद्धा’ या सिनेमाचा दुसरा धमाकेदार ट्रेलर लॉन्च झाला आहे. ‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ चित्रपटात छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याही भूमिका दाखवण्यात आल्या आहेत. या सिनेमात छगन भुजबळ यांची भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी यांनी केलीय. तर दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका साकारली आहे. ‘संघर्षयोद्धा -मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट येत्या 14 जूनला प्रदर्शित होत आहे.
भुजबळ- सदावर्तेंची भूमिका कुणी साकारली?
मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची जीवनकहाणी असलेला ‘संघर्षयोद्धा-मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट येत्या 14 जूनला प्रदर्शित होत आहे. पण या चित्रपटात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिका कोण करणार? याची कमालीची उत्सुकता अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना लागून राहिली होती. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे. छगन भुजबळ यांची भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी, तर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका शिवाजी दोलताडे यांनी साकारली आहे.
कलाकार कोण आहेत?
‘संघर्षयोद्धा’ चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.
शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी देखील निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, विठ्ठल अर्जुन पचपिंड ,जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे, कार्तिक दोलताडे पाटील , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ. सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे.