“मी दहावीत दोनदा नापास झालो, पण काही बिघडलं नाही!”, किरकोळ अपयशाने खचणाऱ्यांनी नागराज मंजुळेंचं मत वाचाच…
मी दहावीत दोनदा नापास झालो होतो. पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो फार तर… मात्र नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही, अशी पोस्ट नागराज यांनी लिहिली आहे.
मुंबई : आपल्या सगळ्यांनाच छोट्या मोठ्या अपयशाने खचायला होतं. आपण हरल्यासारखं वाटतं. पण काही माणसं खूप सकारात्मक असतात. अन् त्यांच्यातली सकारात्मकता ते इतरांमध्ये पेरत असतात, अशीच एक व्यक्ती म्हणजे नागराज मंजुळे… नागराज (Nagraj Manjule) यांच्या वागण्या-बोलण्यात एक सकारात्मकता आहे. त्यांच्या बोलण्यातून ही सकारात्मकता ते इतरांना देत असतात. आताही त्यांनी अशीच एक सकारात्मक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. यात त्यांनी त्यांना शालेय जीवनात आलेल्या अपयशाचा उल्लेख केला आहे. आपण दहावीत दोनदा नापास झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शिवाय सगळ्यात मोठं यश कोणतं तेही त्यांनी सांगितलं आहे.
नागराज यांची फेसबुक पोस्ट
“मी दहावीत दोनदा नापास झालो होतो. पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो फार तर… मात्र नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही. दहावी, बारावी, एमपीएससी , युपीएससी परीक्षा कुठलीही असो… ती अंतिम कधीच नसते. यशापयशात… असल्या-नसल्यात… आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही…”, असं नागराज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
नागराज यांच्या या पोस्टला अनेकांनी पसंती दिलीय. तर अनेकांनी आपल्या फेसबुक वॉलला शेअर केलं आहे.
नागराज यांनी साहित्य संमेलनातही आपलं परखड मत मांडलं होतं. उदगीरमध्ये पार पडलेल्या 16व्या विद्रोही संमेलनाच्या समारोपातल्या भाषणात त्यांनी आपलं मत मांडलं. “आजच्या काळात विद्रोह म्हणजे विद्रोह नाही, तर प्रेम करणं हाच विद्रोह आहे. भांडणं सोपं झालंय आणि भांडण सुरू झाल्यावर शांत बसणं म्हणजे विद्रोह. त्याला खरी ताकद लागते, नाहीतर अरे ला कारे म्हणायला काहीच ताकद लागत नाही,” असं म्हणत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सर्वसामान्यांच्या जगण्यात उपयोगी पडणारं साहित्य आणि कला पुढे आणण्याचं आवाहन केलं आहे.
पुण्यात झालेल्या एका कविसंमेलनातही त्यांनी सिनेमाबद्दल आपलं मत मांडलं होतं. तेही तितकंच विशेष होतं. “जी आत्ता आहे ती संस्कृती हलकट आहे.पण तिचं वय खूप जुनं आहे आणि तुम्ही तिच्याशी जुन्याच शस्त्रांनी लढताय.कवितेने किंवा सिनेमांनी समाज बदलेल असं तुम्हाला वाटतं.पण लय भाबडे लोक आहात तुम्ही. तसं काही होणार नाही. पण आपण लढत रहायला हवं. मी कवितेतून किंवा सिनेमातून फक्त मोकळा होत असतो आणि त्याचे पैसेही मिळतात, ही गोष्ट मला खूप नंतर कळली. कवी होणं किंवा दिग्दर्शक होणं ही माझी कधीच महत्त्वाकांक्षा नव्हती. पण आतला जाळ मोकळा करत रहावं माणसांनी… लय थंडावा मिळतो जिवाला…”, असं नागराज मंजुळे म्हणाले आहेत.