‘समरेणू’चे ‘झिम्माड’ करणारे प्रेमगीत प्रदर्शित, सिनेमा 13 मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला…
'सुरवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय....' अशी टॅगलाईन असलेला महेश डोंगरे लिखित, दिग्दर्शित 'समरेणू' चित्रपट येत्या 13 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे शीर्षकगीत प्रदर्शित करण्यात आले होते. त्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर या चित्रपटातील दुसरे रोमँटिक गाणे प्रदर्शित झाले आहे. 'झिम्माड' असे या गाण्याचे बोल आहेत.
मुंबई : ‘सुरवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय….’ अशी टॅगलाईन असलेला महेश डोंगरे लिखित, दिग्दर्शित ‘समरेणू’ (Samrenu) चित्रपट येत्या 13 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे शीर्षकगीत प्रदर्शित करण्यात आले होते. त्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर या चित्रपटातील दुसरे रोमँटिक गाणे प्रदर्शित झाले आहे. या प्रेमगीताचे बोल ‘झिम्माड’ (Jhimmad Love Song) असे असून या गाण्याला कुणाल गांजावाला आणि निती मोहन यांचा सुरेल आवाज लाभला आहे. क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला सूरज -धीरज यांचे संगीत लाभले आहे.
या गाण्यात सम्या आणि रेणू आपल्या नजरेने आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. जोडीदाराची प्रत्येक क्षणी मिळणारी साथ ही किती मोलाची असते, हे या गाण्यातून दिसत आहे. या गाण्यात नवरा-बायको आणि एक गोड बाळ दिसत असले तरी त्यामागे एक कथा आहे. ज्याचा उलगडा चित्रपटात होणार आहे.
‘समरेणू’ चित्रपटाचे दिग्दर्शक महेश डोंगरे म्हणतात, ” ‘समरेणू’ चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना आवडत आहेत. जसे प्रेक्षक गाण्यांना भरभरून प्रतिसाद देत आहेत तसाच प्रतिसाद प्रेक्षक चित्रपटाला देतील याची मला खात्री आहे. या गाण्यामध्ये चित्रपटाची कथा एका वेगळ्याच वळणावर गेलेली पाहायला मिळत आहे, त्यामुळे चित्रपटात वेगळी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. एक दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून या चित्रपटातून मी पदार्पण करत आहे त्यामुळे ‘समरेणू’ माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मला खूप काही नवीन शिकायला मिळाले.”
‘समरेणू’ ची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत. या चित्रपटात महेश डोंगरे, रूचिता मांगडे, भरत लिमण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.