आज गुढी पाडव्याचा सण… साडे तीन मुहूर्तांपैकी एक… या शुभ दिनी अनेकजण नव्या गोष्टींचा शुभारंभ करतात. काही नव्या सिनेमांची घोषणादेखील आज करण्यात आली आहे. अभिनेता सुबोध भावे याच्या नव्या सिनेमाची गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घोषणा करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’चे पहिले पोस्टर आऊट झालं आहे. येत्या दिवाळीत संगीत मैफल सजणार आहे. मराठी परंपरेचा साज… मनामनात गुंजणार… सुरेल गीतांचा आवाज…चित्रपट 1 नोव्हेंबर 2024 ला हा सिनेमा प्रदर्शित महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
अभिनेता सुबोध भावे आणि जिओ स्टुडिओज यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’चं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे. आज गुढीपाडव्याचे औचित्य साधून हे पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत म्हणजेच 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली होती. या घोषणेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.
आज या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. या पोस्टरमध्ये सुबोध भावेंचा चित्रपटातील एक वेगळा लूक आणि पेहराव पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची भव्यता या पोस्टरमध्ये दिसते आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ तसंच ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे. मुख्य म्हणजे प्रसिध्द संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत या चित्रपटात असणार आहे.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या अजरामर कलाकृतीवरून प्रेरित, ‘संगीत मानापमान’ हा संगीतमय चित्रपट 1 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शनासाठी सज्ज होणार आहे.
सुबोध भावेने खास पोस्ट शेअर करत या सिनेमाची घोषणा केली आहे. गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नव वर्षाच्या तुम्हा सर्वांना ‘संगीत मानापमान’च्या संपूर्ण संघाकडून मनःपूर्वक शुभेच्छा, म्हणत सुबोधने या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे.