सोनाली कुलकर्णी यांच्याकडून मोठी घोषणा; म्हणाल्या, मला सांगायला आनंद होतोय की…
Actress Sonali Kulkarni Facebook Live About Her New Book : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी काही वेळाआधी फेसबुक लाईव्ह केलं. या फेसबुल लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा करत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्काच दिला. सोनाली कुलकर्णी नेमकं काय म्हणाल्या? वाचा...
मुंबई | 17 मार्च 2024 : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी… त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो. त्यांचे सिनेमे, त्यांची नाटकं याला प्रेक्षक गर्दी करतात. सोनाली या जितक्या सशक्त अभिनेत्री आहेत. तितकंच समाजातील विविध घटनांबाबत त्या जागृक असतात. सामाजिक घटनांवर त्या आपलं परखड मत मांडतात. तितकंच त्या कसदार लेखनही करतात. त्यांचं लेखन वाचकांना आवडतं. अगदी साध्या शब्दांमध्ये पण तितकाच सखोल अर्थ असलेलं लेखन सोनाली कुलकर्णी करतात. काही वेळा आधी सोनाली यांनी फेसबुक लाईव्ह केलं. यातून सोनाली कुलकर्णी यांनी मोठी घोषणा केली आहे.
सोनाली यांच्याकडून नव्या पुस्तकाची घोषणा
सोनाली कुलकर्णी यांनी फेसबुक लाईव्ह केलं आहे. यातून त्यांनी नव्या पुस्तकाची घोषणा केली आहे. ‘सो कुल टेक 2’ हे सोनाली कुलकर्णी यांचं नवं पुस्तक बाजारात आलं आहे. याबाबत सोनाली कुलकर्णी यांनी फेसबुक लाईव्हमध्ये घोषणा केली आहे. लवकरच या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. मात्र त्याआधी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सोनाली यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
एक वर्तमानपत्रात सोनाली कुलकर्णी यांचे लेख प्रकाशित होतात. या लेखांचा या पुस्तकात संग्रह करण्यात आला आहे. विविध विषयांवरचे लेख या पुस्तकात देण्यात आले आहेत. दहा वर्षांआधी सोनाली कुलकर्णी यांचं ‘सो कुल’ हे पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता दहा वर्षांनंतर या पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशित होत आहे.
चाहत्यांचे आभार
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या नव्या पुस्तकाची घोषणा करणार होते. मात्र काही दुकानांमध्ये हे पुस्तक उपलब्ध झालं आहे. त्यामुळे अनेकांचे मला फोन आले. अनेकांनी शुभेच्छा दिल्या. मग विचार केला की, चांगली गोष्ट आपल्या माणसांसोबत शेअर करायला वेळ कशाला लावायचा… आपल्या मनात आलं की ते सांगून टाकावं. म्हणून आज या पुस्तकाची घोषणा करते आहे. याच्या प्रकाशन सोहळ्याबाबत लवकरच कळवेन. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे हे शक्य झालं, असं सोनाली यांनी या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं.