‘गूगल आई’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड महत्त्वपूर्ण भूमिकेत
Google Aai Movie Trailer Released : 'गूगल आई' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'गूगल आई' सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. सध्या काळातील गोष्ट हा सिनेमा सांगतो. या सिनेमात कोण - कोण कलाकार आहेत? सिनेमाची गोष्ट काय? वाचा सविस्तर बातमी...
शोध… भीती… काळजी… वेदना… अशा भावनांच्या विविध छटा उलगडणारा ‘गूगल आई’ सिनेमाचा रोमांचक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून ‘गूगल आई’मध्ये काय रहस्य दडलंय, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच ‘गूगल आई’ बद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांची इच्छा होती. त्यात आता या उत्कंठावर्धक ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये ‘गूगल आई’ या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. ‘गूगल आई’ हा चित्रपट येत्या 26 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा म्हणजे आजच्या पिढीची गोष्ट आहे. आजच्या पिढीच्या प्रश्नांवर हा सिनेमा भाष्य करतो.
ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती
एक हसतेखेळते, आनंदी कुटुंब आहे. अचानक त्यांच्या या सुखी कुटुंबात एक वादळ येते. या वादळात संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाल्याचे दिसत आहे. आता त्यांच्या आयुष्यात हे वादळ कसे आले, त्यातून ते बाहेर पडणार का? यात ‘गूगल आई’ची कशी मदत होणार, या सगळ्या प्रश्नांची प्रेक्षकांना चित्रपट पाहून मिळणार आहेत. दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथच्या दिग्दर्शकांनी केल्यामुळे यात साऊथचा तडकाही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ‘गूगल आई’च्या निमित्ताने मराठी चित्रपट एका वेगळ्या वळणावर गेल्याचे चित्र आहे.
View this post on Instagram
विविध भावनिक छटा उलगडणारा ‘गूगल आई’ चित्रपटाचा रंजक, रोमांचक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत ‘गूगल आई’ या चित्रपटाचे डॉलर दिवाकर रेड्डी निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन गोविंद वराह यांचे आहे. तर ‘गूगल आय’ला एस सागर यांचे संगीत लाभले आहे. प्रणव रावराणे, प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट येत्या 26 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
सिनेमाची गोष्ट काय?
मराठी सिनेसृष्टीबद्दल मला कायमच आकर्षण राहिले आहे. त्यामुळे मराठीत एखादी तरी कलाकृती करावी, असे मनात होतेच आणि माझी ही इच्छा ‘गूगल आई’च्या निमित्ताने पूर्ण झाली. खरं तर साऊथ आणि मराठीची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. परंतु या सगळ्याच कलाकारांनी मला खूप सहकार्य केले. यात या चिमुरडीचे विशेष कौतुक करावे लागेल. तिनेही यात कमाल अभिनय केला आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा तिच्याभोवती फिरणारी आहे. थरार, रहस्यांनी भरलेला हा चित्रपट कौटुंबिक असून संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा आहे, असं दिग्दर्शक गोविंद वराह यांनी म्हटलं आहे.