मुंबई : आशय, विषय आणि सादरीकरण यांत नेहमी वैविध्य राखत महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी अनेक कलाकृती केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा येणारा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी मेजवानीच असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘अंतिम’ या हिंदी चित्रपटाचं सिनेरसिकांकडून जोरदार कौतुक होतंय आणि आता नव्या वर्षात ते एक नवा मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ असं वेगळं शीर्षक असलेला हा चित्रपट 21 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय. चित्रपटाच्या पोस्टरनंतर नेमके कोणते कलाकार या चित्रपटात झळकणार? कोणती भूमिका साकारणार? याकडे रसिक प्रेक्षकांच्या नजरा आहेत. ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी लिहिलेल्या ‘वरनभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथेवर हा चित्रपट आधारित असून चित्रपटाची पटकथा व दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी महेश मांजरेकर यांनी सांभाळली आहे.
चाळी झाल्या रे सपाट,
टॉवरचा थाटमाटशांघायच्या स्वप्नामधून आता डोळे जागले
कवल्या कवल्या जिंदगीला लंबे लंबे लागले
लेखक – जयंत पवार
दिग्दर्शक – महेश मांजरेकरनाय वरणभात लोन्चा
कोन नाय कोन्चा२१ जानेवारी, २०२२ पासून आपल्या जवळच्या थेटरात pic.twitter.com/4LglS6bs3O
— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) December 8, 2021
अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांची निर्मिती तसेच वितरण करणाऱ्या ‘एन एच स्टुडिओज’ या भारतातल्या अग्रगण्य निर्मिती संस्थेने ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटाच्या प्रस्तुतीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘एन एच स्टुडिओज’ मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र हिरावत व श्रेयांस हिरावत यांनी केली असून सहनिर्मिती ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’च्या विजय शिंदे यांनी केली आहे.
महेश मांजरेकर यांच्या आजवरच्या चित्रपटांची लोकप्रियता लक्षात घेता ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट ही त्याला अपवाद नसेल. 21 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.