‘आगिनफुले’ची ‘ठिणगी ठिणगी’ झाली आणि गाण्याने रसिकांची मने जिंकली! वाचा ‘ऐरणीच्या देवा’ गाण्याचा किस्सा…
'साधी माणसं' या चित्रपटातील, जगदीश खेबुडकर लिखित हे गाणं आहे. चित्रपटाच्या नावाला शोभणारे बोल, त्याला लतादीदींचा आवाज आणि संगीतसरितेचा निखळ प्रवाह, त्याला दिदींनीच 'आनंदघन' या नावाने संगीतकार म्हणून स्वतः दिलेले संगीत यातून जे गीत बनलं आहे, ते आपल्या सर्वांच्या मनात अजरामर झालेलं आहे.
मुंबई : काही जुनी गाणी रसिकांसाठी नेहमीच त्यांच्या हृदयाजवळची असतात. जुन्या गाण्यातील शब्द, त्यांचे भाव आणि त्यातील आपुलकी आजही ऐकणाऱ्याच्या मनाला मोहीत करते. हिंदीच नव्हे तर, कित्येक मराठी गाणी देखील आजही चिरतरुण वाटतात. अशाच एका गाजलेल्या आणि अजरामर गाण्यांपैकी एक आहे ‘साधी माणसं’ या चित्रपटातील ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे’ (Airaneechya Deva Tula) हे गीत…
‘साधी माणसं’ या चित्रपटातील, जगदीश खेबुडकर लिखित हे गाणं आहे. चित्रपटाच्या नावाला शोभणारे बोल, त्याला लतादीदींचा आवाज आणि संगीतसरितेचा निखळ प्रवाह, त्याला दिदींनीच ‘आनंदघन’ या नावाने संगीतकार म्हणून स्वतः दिलेले संगीत यातून जे गीत बनलं आहे, ते आपल्या सर्वांच्या मनात अजरामर झालेलं आहे.
खेबुडकरांची गाणी घ्यायची नव्हती!
चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांना आपल्या आगमी चित्रपटात अर्थात ‘साधी माणसं’ या चित्रपटात जगदीश खेबुडकर यांची गीते नको होती, असा विचार त्यांनी आपल्या मनाशी पक्का केला होता. तर, याऐवजी भालजी स्वतः आणि गीतकार योगेश या चित्रपटासाठी गीतलेखन करणार होते. तशी बातमी देखील वृत्तपत्रात छापून आली होती.
जगदीश लगेच निघून ये!
भालजी पेंढारकरांनी गीतं लिहिली, मात्र त्यांचं मन एका गाण्यापाशी अडून राहिलं होतं. काहीच सुचेना झाल्यावर त्यांनी थेट खेबुडकरांना फोन लावला आणि सांगितलं की, ‘जगदीश असशील तसा लगेच निघून ये..’ त्यावेळी जगदीश खेबुडकर स्वतः एक शिक्षण म्हणून काम करत होते. त्यांनी सायकल काढली आणि ते थेट भालजी यांच्या स्टुडीओत पोहोचले.
तूच लिहू शकतोस!
स्टुडीओत पोहचल्यावर भालजी म्हणाले, मी एक चित्रपट करतोय, ज्याच्यासाठी एक मुख्य गाणं सुचत नाहीय. एक लोहार, त्याचं कष्टकरी सुखी कुटुंब, ते लोहारकाम करतंय असं भावनिक दृश्य या गाण्यात आलं पाहिजे. तुझं गाणं नको याच विचाराने मी लिहित होतो, पण यावर सगळं अडलंय’. इतक्यात जगदीश खेबुडकर यांना गाण्याच्या ओळी सुचल्या होत्या. त्यांनी तडक कागद आणि पेन घेतला व या गाण्याच्या ओळी लिहिण्यास सुरुवात केली.
‘आगिनफुले’ची ‘ठिणगी ठिणगी’ झाली
हे गाणं होतं ‘ऐरणीच्या देव तुला ठिणगी ठिणगी वाहू दे…’. मात्र, सुरुवातीला या गाण्याचे शब्द होते ‘ऐरणीच्या देव तुला आगिनफुले वाहू दे’. ‘ठिणगी ठिणगी’ आणि ‘आगिनफुले’ हे दोन्ही शब्द सारख्याच अर्थाचे आहेत. पण रेकॉर्डिंगच्या आयत्यावेळेस तिथे ‘आगिनफुले’ या शब्दांची जागा ‘ठिणगी ठिणगी’ या शब्दाने घेतली.
एक लोहार जोडपं त्यांचं दैनंदिन लोहारकाम करताना, त्याची नायिका हे गाणं गात आहे. समोर ऐरणीवर हतोड्याने काहीतरी ठोकत तिचा नवरा बसलेला आहे आणि ही भाता हालवत आहे. खिडकीतून काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक तिला चोरून पाहत आहेत आणि गाणं पुढं जात राहतं. त्यांचे एकंदरीत हावभाव, गाण्याच्या संगीतासोबत लयबद्ध पद्धतीने हलणारा भाता, सोबत हातोडी ने ऐरणीवर घाव घातलेला आवाज पण संगीत म्हणून अगदी रास्त वापरला गेला आहे. या गाण्याचा कृष्णधवल व्हिडीओ पाहून मनात मात्र भावनांचे इंद्रधनुष्य उमटते.
हेही वाचा :
‘केवळ मराठी व्यक्तीरेखा म्हणून मराठी कलाकार असं नको’, सचिन पिळगावकरांनी व्यक्त केली खंत
‘आता काळजाचा ठोका चुकणार नाही तर थांबेल…कायमचा…’, ‘शेवंता’च्या पुनरागमनासाठी चाहते उत्सुक!