मुंबई : सध्या ‘टाइमपास3’ (Timepass 3) चा सर्वत्र बोलबाला आहे. चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. त्यापैकीच एक ट्रेंडिंग गाणे म्हणजे ‘वाघाची डरकाळी’. नुकताच ठाण्यातील रिक्षा स्टँडवर हृता दुर्गुळे (Hruta Durgule), प्रथमेश परब, मनमीत पेम यांनी या गाण्यावर ठेका धरला. या वेळी त्यांना रिक्षाचालकांनीही साथ दिली. विशेष म्हणजे यात काही महिला रिक्षाचालकही होत्या. या प्रसंगी दिग्दर्शक रवी जाधवही उपस्थित होते. क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबध्द केलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर हे गाण्याला वैशाली सामंतचा ठसकेबाज आवाज लाभला आहे. झी स्टुडिओज आणि अथांग कम्युनिकेशन्स निर्मित, रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास 3’ येत्या 29 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
रंगभूमी, मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अप्रतिम अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. ‘अनन्या’ चित्रपटाच्या माध्यमातून हृता रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर हृताने अल्पावधीतच आपला फॅन फॉलोअर्स वाढवला. हृताचे असंख्य चाहते असून तिची एक झलक पाहण्यासाठी, तिला भेटण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. बरेच चाहते तिच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही संवाद साधतात आणि हृताही आपल्या चाहत्यांना अगदी आनंदाने प्रतिसाद देते. आता तिचा ‘टाइमपास 3’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘टाइमपास’ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू आणि प्राजूची जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोरी. पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनाला हुरहूर लावून अधुरी राहिलेली प्रेमकथा दुसऱ्या भागात प्रेक्षकांना आनंद देत पूर्ण झाली. पहिल्या भागात बालपणात एकमेकांपासून दुरावलेले दगडू आणि प्राजू दुसऱ्या भागात तरुणपणात एकमेकांना भेटले आणि एकही झाले. याच बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं ? प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल झाले? हे सांगणारी गोष्ट आता टाइमपास 3 मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.