मुंबई : मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांची ‘अजूनही बरसात आहे’ ही नवीकोरी मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. आपणही जर या एव्हरग्रीन जोडीचे फॅन असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची, पण तितकीच धक्का देणारी बातमी आहे. उत्तमोत्तम ऑडिओ कन्टेन्ट निर्माण करणाऱ्या ‘स्टोरीटेल मराठी’ या जगविख्यात प्लॅटफॉर्मने खास नव्याने तयार केलेल्या ‘61 मिनिट्स’ या ओरिजिनल ऑडिओ ड्रामामध्ये मुक्ता आणि उमेश एका वेगळ्याच रूपात आपल्यासमोर येणार आहेत आणि ओंकार गोवर्धन, समीर पाटील आणि रोहित कोकाटे हे कसलेले कलाकार त्यांच्याबरोबरीने असणार आहेत.
समजा.. आपण कुठे फिरायला गेलोय, कुटुंबाबरोबर मस्त वेळ घालवतोय, सगळं कसं छान चाललंय म्हणून मनातल्या मनात खुश होतोय, अन् अचानक आपल्याला कोणीतरी किडनॅप केलं.. तर? किडनॅप करून अंधाऱ्या खोलीत डांबलं.. तर?
मयूर, निशा, स्वानंद आणि आवारे सर या चौघांनी या ‘तर?’ चा विचार कधी केलाच नव्हता. म्हणूनच ते अश्या खोलीत प्रत्यक्षात सापडल्यानंतर पुरते हबकले आहेत. त्यात त्यांना तिथे कोणी किडनॅप करून आणलंय, त्यामागचं कारण काय, त्या किडनॅपरला हवंय काय हेही कोणी सांगत नाहीये. डोळ्यांत बोट घातलं तरी दिसणार नाही, अश्या ठार अंधारात अखेर स्पीकरवरून एक घोषणा दिली जाते, ज्यात त्यांना एक कोडं घातलं जातं, जे त्यांच्याच पूर्वायुष्याशी निगडित आहे. ते सोडवणं हाच त्या चौघांपुढे एकमेव पर्याय उरतो अन् सुरू होतं एक थरारनाट्य..!
ते कोडं त्यांना सुटतं का? 61 मिनिटांचं नक्की काय महत्त्व आहे? त्या चौघांना तिथे का आणलं गेलंय? तो किडनॅपर कोण आहे? त्याला नक्की काय हवंय? या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजेच ‘61 मिनिट्स’ हा ऑडिओ ड्रामा..!
मुक्ता बर्वे हिने यापूर्वी रंगवलेली सर्व पात्रं ही हवीहवीशी, सर्वांना प्रेमात पाडणारी अशी आहेत. उमेश कामत हा तर लाखो तरुणींचा लाडका अभिनेता आहे. ओंकार गोवर्धन याने ‘सावित्री-ज्योती’ या मालिकेत रंगवलेली महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका प्रेक्षकांच्या खास आवडीची ठरलीये. समीर पाटील आपल्याला ‘पोश्टर बॉयज्’, ‘पोश्टर गर्ल’, ‘विकून टाक’ अश्या धमाल विनोदी चित्रपटांचे लेखक-दिग्दर्शक म्हणून परिचित आहेत.
पण आपण ‘61 मिनिट्स’ हा ऑडिओ ड्रामा ऐकाल, तेव्हा या सर्व कलाकारांच्या प्रचलित प्रतिमांना धक्का देणाऱ्या भूमिका आपल्याला अनुभवायला मिळतील. या सर्व ताकदीच्या कलाकारांच्या अभिनयक्षमतेला पुरेपूर न्याय देणाऱ्या या भूमिका अन् त्यांच्यातल्या नाट्यातून उलगडणारा सस्पेन्स हा श्रोत्यांना थरारून टाकणारा आहे. ‘कौल’ हा सिनेमा गाजवणाऱ्या रोहित कोकाटेची या ऑडिओ ड्रामामध्ये विशेष भूमिका आहे.
‘इप्सिता’, ‘धारणा’, ‘अफेअर’ अश्या लोकप्रिय ठरलेल्या ऑडिओ सीरीजचा युवा लेखक तुषार गुंजाळ याच्याच लेखणीतून ‘61 मिनिट्स’ हे थरारनाट्य उतरले आहे. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या सुप्रसिद्ध दिग्दर्शक जोडगोळीच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या तुषारनेच या ऑडिओ ड्रामाचे दिग्दर्शनसुद्धा केलेले आहे. ‘61 मिनिट्स’ या ऑडिओ ड्रामाच्या शेवटी जो संदेशवजा अनुभव मिळतो तो सर्वांपर्यंत पोहचणं अत्यंत गरजेचं आहे. तो अनुभव घेण्यासाठी अन् मुक्ता बर्वे, उमेश कामत, ओंकार गोवर्धन, समीर पाटील आणि रोहित कोकाटे या कसलेल्या अभिनेत्यांच्या आवाजातली थरारक जादू अनुभवण्यासाठी ‘61 मिनिट्स’(61 Minutes) हा ऑडिओ ड्रामा आपल्याला नक्की ‘ऐकावा’ लागणार आहे.
(Umesh Kamat and Mukta Barve’s ’61 Minutes’ audio book Experience of thriller at home)
Surbhi Chandna : टेलिव्हिजनची बोल्ड ‘नागिन’ सुरभी चंदनाचं ग्लॅमरस रुप, पाहा फोटो