हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव ‘छुपे रुस्तम’ साठी सज्ज, 15 मे ला शुभारंभाचा प्रयोग
प्रिया पाटील आणि अनिता महाजन यांनी ‘छुपे रुस्तम’ नाटकाची निर्मीती केली आहे. या आधी या संस्थेच्या वतीने विविध व्यावसायिक नाट्यस्पर्धे मध्ये गाजलेलं ‘गलती से मिस्टेक’ या धम्माल विनोदी नाटकासोबत ज्वलंत, आशयघन व विनोदाची हळूवार फुंकर घालणारं ‘डोन्ट वरी हो जाएगा’ यासारख्या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे.
मुंबई : लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तीनही प्रांतात मुशाफिरी करत अभिनेते हृषिकेश जोशी (Hrishikesh Joshi) आणि प्रियदर्शन जाधव (Priyadarshan Jadhav) यांनी आजवर प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन केले आहे. सध्या मात्र नाटयवर्तुळात हे दोघेही छुपे रूस्तम असल्याची चर्चा रंगली आहे? या दोघांना छुपे रूस्तम का म्हटंल जातय? नेमकी कोणती भानगड या दोघांनी केली आहे? या सगळ्याचा खुलासा येत्या 15 मे ला होणार आहे. हे दोन्ही हरहुन्नरी अभिनेते आगामी ‘छुपे रुस्तम’ (Chhupe Rustam) या नाटकासाठी एकत्र आले आहेत.
प्रवेश व दिशा निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित हे दोन अंकी नाटक 15 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव ही जोडगोळी एकत्र येणार म्हणजे काहीतरी खुमासदार असणार हे वेगळं सांगायला नको. फार्स, गंमत, गॅासिप लपवाछपवी अशा सगळ्या गोष्टींनी हे नाटक रंगत जात. खास विजय केंकरे टच असलेल्या या नाटकात काम करणे ही आमच्यासाठी पर्वणी असल्याचे हे दोघे सांगतात.
शुभारंभाचा प्रयोग
रविवार 15 मे दुपारी 4.15 वा. दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले आणि सोमवार 16 मे दुपारी 3.30 वा. शिवाजी मंदिर दादर येथे या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत.
शंभर टक्के खरं कधीच कोणी बोलत नसतं. प्रत्येकजण काही ना काही लपवाछपवी करत असतो. ही लपवाछपवी जर नवरा बायको मधली असेल तर मग सगळा मामला कठीण होऊन बसतो. नवरा बायकोच्या नात्यातील लपवाछपवीचा हा खेळ आणि त्यातून उडणारी तारांबळ, तारेवरची कसरत, झालेली गोची याची सगळी धमाल म्हणजे ‘छुपे रुस्तम’ हे नाटक. ‘द लाय’ या फ्रेंच नाटकावर हे नाटक बेतलं आहे. हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव या दोघांसोबत मयूरा रानडे आणि कृष्णा राजशेखर या नाटकात काम करतायेत. विनोदाचा डोस देत नवरा बायकोच्या नात्यातील अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न ‘छुपे रुस्तम’ हे नाटक करतं.
प्रिया पाटील आणि अनिता महाजन यांनी ‘छुपे रुस्तम’ नाटकाची निर्मीती केली आहे. या आधी या संस्थेच्या वतीने विविध व्यावसायिक नाट्यस्पर्धे मध्ये गाजलेलं ‘गलती से मिस्टेक’ या धम्माल विनोदी नाटकासोबत ज्वलंत, आशयघन व विनोदाची हळूवार फुंकर घालणारं ‘डोन्ट वरी हो जाएगा’ यासारख्या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. लेखक तेजस रानडे यांनी या नाटकाचे लेखन केले आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे तर संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे.