छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घडामोडी या शिवराज अष्टकाच्या माध्यमातून म्हणजेच आठ विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) करत आहेत. याच शिवराज अष्टकातील चौथा चित्रपट ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) शुक्रवारी (22 एप्रिल) प्रदर्शित होतोय. त्याआधी फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते. दिग्पालच्या या तिनही चित्रपटांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. ‘पावनखिंड’ने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली होती. आता ‘शेर शिवराज’ला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळेल, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र त्याचसोबत शेर शिवराजनंतर शिवराज अष्टकातील कोणता अध्याय प्रेक्षकांसमोर मांडणार, याचीही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. याचं उत्तर ‘शेर शिवराज’च्या अखेरीस प्रेक्षकांना मिळणार आहे. (Marathi Movie)
‘शेर शिवराज’मध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी कशाप्रकारे अफजलखानाचा वध केला, याची कथा सांगण्यात आली आहे. याच चित्रपटाच्या अखेरीस दिग्पाल यांनी आगामी भागाची घोषणा केली. शिवराज अष्टकातील पाचवा चित्रपट हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा मोहिमेवर असणार आहे. ‘पावनखिंड’नंतर लगेचच ‘शेर शिवराज’ प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र ‘शेर शिवराज’नंतर पुढील चित्रपटासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.
आग्रा मोहिमेवरील चित्रपट हा 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. राजगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यासाठीची मोहीम, त्यांची आग्रा भेट, या भेटीदरम्यान झालेल्या घडामोडी आणि महाराजांची आग्र्याहून झालेली सुटका.. या सर्व गोष्टी या चित्रपटात पहायला मिळतील. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या शिवराज अष्टकातील चित्रपटांमध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. त्याच्या दमदार अभिनयाला प्रेक्षक-समीक्षकांकडून दाद मिळतेय.
हेही वाचा:
Sher Shivraj Review: ‘शेर शिवराज’ची दुमदुमणारी गर्जना; बरंच काही शिकवून जातो प्रतापगडाचा रणसंग्राम