‘रसोडे में कौन था?’ या इंस्टाग्राम रीलमुळे घराघरात पोहोचलेला सोशल मीडिया स्टार यशराज मुखाटे आता सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटातून तो सिनेसृष्टीत पहिलं पाऊल ठेवतोय. ‘एक दोन तीन चार’ या सिनेमाच्या माध्यमातून म्युझिक डिरेक्टर म्हणून यशराज मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. ‘लवचुंबक लोचे’ हे गाणं यशराजने कंपोज केलं आहे. अभिनेत्री वैदेही परशुरामी आणि निपुण धर्माधिकारी यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. ‘एक दोन तीन चार’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून यशराज मुखाटेचं पहिलं वहिलं सिनेमातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
यशराज मुखाटेच्या चाहत्यांसाठी खूप मोठी खुशखबर आहे कारण यशराज मुखाटे म्युझिक डिरेक्टर म्हणून मराठी इंडस्ट्री मध्ये पदार्पण करतोय. जिओ स्टुडिओजच्या, वरूण नार्वेकर दिग्दर्शिक ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटाच्या शीर्षक गीताला यशराजने कंपोज केलंय. ‘लवचुंबक लोचे’ या गाण्याचं नाव आहे. गाण्याचे बोल अगदी युनिक आहेत. अक्षयराजे शिंदे यांनी ते लिहिले आहेत. हे गाणं सिनेमाच्या अगदी टर्निंग पॉईंटवर पाहायला मिळतं.
‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील ‘रसोडे में कौन था?’ या डायलॉगपासून यशराज मुखाटेने तयार केलेलं रॅप प्रचंड व्हायरल झालं व्हायरल कंटेन्टपासून कमाल गाणी आणि म्युझिक बनवून यशराज मुखाटेने आतापर्यंत भरपूर फेम मिळवलाय. टीव्ही शो च्या प्रसिद्ध डायलॉग्सचे रॅप बनवून त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातत दर्शकांची मनं जिंकली. बघता बघता तो सोशल मीडिया स्टार झाला. प्रेक्षकांसोबतच इंडस्ट्रीमधल्या कलाकारांनी सुद्धा त्याच्या या टॅलेंन्टचं कौतुक केलं आणि त्याच्या टॅलेंटच्या हिमतीवरच आज यशराज एक पाऊल पुढे टाकतोय.
चित्रपटात मुख्य भूमिकेत वैदेही परशुरामी आणि निपुण धर्माधिकारी व्यतिरिक्त मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर आणि करण सोनावणे यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. सायली आणि समीरच्या आयुष्यात अशी कोणती गुगली पडते की ज्यामुळे त्यांचे ‘लवचुंबक लोचे’ झाले हे पाहण्यासाठी 19 जुलैची वाट पाहावी लागणार आहे.