मराठी हास्यकलाकार सागर कारंडे यांची 61 लाखांची फसवणूक झाली आहे. सायबर चोरट्यांकडून सागर कारंडेना 61 लाखांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी 3 अज्ञात व्यक्तींविरोधात मुंबई सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर लाईकच्या बदल्यात 150 रुपयांचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींना कारंडे यांच्या खात्यात 22 हजार रुपये देखील पाठवले असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पैसे उकळून अभिनेत्याची फसवणूक केली आहे. सध्या पोलिसांकडून प्रकरणाचा कसून तपास सुरू.
सागर कारंडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातून आणि विविध नाटकांमधून अभिनेता सागर कारंडेनं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. सोशल मीडिया इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सागर कारंडे कायम चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.
सागर कारंडे कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. सागर कारंडे यांना इन्स्टाग्रामवर 106K फॉलोअर्स आहेत. तर 328 नेटकऱ्यांना स्वतः सागर कारंडे फॉलो करतात. सागर कारंडे यांच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. पण आता झालेल्या फसवणुकीमुळे सागर कारंडे चर्चेच आले आहेत.