Gully Boy Review: रणवीर-आलिया आणि झोयासाठी गली बॉय जरुर बघा!
Gully Boy Review : प्रत्येकानं आयुष्यात काही ना काही स्वप्न बघितलेली असतात आणि याच स्वप्नांची पूर्ती करणारा चित्रपट म्हणजे ‘गली बॉय’ (Gully Boy). हा चित्रपट अशा सगळ्यांसाठी आहे जे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा टाईम येतो यावर सगळ्यांनी विश्वास ठेवायला हवा. ही प्रेरणादायी कथा निवडल्याबद्दल झोया अख्तरचं अभिनंदन. चित्रपटाची कथा मुंबईतील […]
Gully Boy Review : प्रत्येकानं आयुष्यात काही ना काही स्वप्न बघितलेली असतात आणि याच स्वप्नांची पूर्ती करणारा चित्रपट म्हणजे ‘गली बॉय’ (Gully Boy). हा चित्रपट अशा सगळ्यांसाठी आहे जे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा टाईम येतो यावर सगळ्यांनी विश्वास ठेवायला हवा. ही प्रेरणादायी कथा निवडल्याबद्दल झोया अख्तरचं अभिनंदन.
चित्रपटाची कथा मुंबईतील धारावीच्या झोपडपट्टीतुन सुरु होेते. मुराद गरीबी आणि समाजातील बहिष्कार सहन करत असलेला युवक आहे. वडिलांचं सतत टोचून बोलणं; आई-वडिलांची सतत होणारी भांडणं, यामुळे कुढत जीवन जगत असलेल्या मुरादचं स्वप्न मोठा रॅपर बनण्याचं असतं. एकीकडे घरच्या तणावामुळे होणारी ओढाताण; रॅपर बनण्याचं स्वप्न; आयुष्यात कुठलाही रंग न उरलेल्या मुरादला साथ देते त्याची प्रेयसी सैफिना. मुरादची ओळख त्याच्याच कॉलेजमधील रॅपर एमसी शेरशी होते आणि त्याचं आयुष्यच बदलतं. शेरसोबत मिळून मुराद स्वत:ची रॅपर टीम तयार करतो आणि सुरु होतो एक स्वप्नवत प्रवास. आता मुरादचं रॅपर बनण्याचं स्वप्न पूर्ण होतं का? त्याला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर तुम्हाला ‘गली बॉय’ बघावा लागेल.
चित्रपटाची पटकथा झोया आणि रिमा कागतीनं लिहिली आहे. ज्या पध्दतीनं दोघींनी चित्रपटाला ट्रीटमेन्ट दिलीय ती लाजवाब. धारावीच्या झोपडपट्टीचं चित्रीकरण आतापर्यंत बऱ्याच सिनेमात आपण बघितलं आहे. अगदी अलिकडेच आलेल्या ‘काला’ आणि ‘बियॉन्ड द क्लाईड्स’ या चित्रपटातही. पण या चित्रपटात झोपडपट्टी एक पात्र असल्याचा भास आपल्याला होत राहतो. याचं संपूर्ण श्रेय सिनेमॅटोग्राफर जय ओझा यांना जातं. त्यांनी ज्या पध्दतीनं धारावीचं चित्रीकरण केलंय ते अप्रतिम.
मुरादच्या भूमिकेत रणवीरनं धमाल केली आहे. ‘सिम्बा’नंतर रणवीरनं अजून एक पाऊल पुढे टाकलं आहे. त्याने वठवलेला मुराद बऱ्याच ठिकाणी केवळ नजरेतून बोलतो. वडिलांसोबत उडणारा खटका असो वा चित्रपटाच्या शेवटचा रॅप असो रणवीर काय ताकदीचा अभिनेता आहे यातून दिसतं. आलिया तर कमाल. आपल्या प्रत्येक दृश्यात तिनं कमाल केली आहे. मुरादप्रति असलेला सैफिनाचा पझेसिव्हनेस तिनं अप्रतिम वठवला आहे. तिची भूमिका छोटी असली तरी लक्षवेधी आहे. रणवीर सोबतची तिची केमिस्ट्री वाखाणण्याजोगी आहे. अमृता सुभाष; ज्योती सुभाष आणि विजय राज यांच्या भूमिका जरी छोट्या असल्या तरी दमदार आहेत. सिनेमातलं सरप्राईज पॅकेज ठरलाय सिध्दांत चतुर्वेदी. रॅपर एमसी शेरच्या भूमिकेत त्याने रणवीरच्या तोडीस तोड अभिनय केला आहे.
रॅप हा जॉनर अजून एवढा भारतात प्रचलित नाही. त्यामुळेच हा चित्रपट भारतीय रसिकांसाठी ट्रीट आहे. हा चित्रपट नाईजी आणि डिवाईन या रॅपर जोडीच्या आयुष्यावर आधारित आहे. चित्रपटाची गाणी आधीच हीट झाली होती. ती मोठ्या पडद्यावर बघायला अजून मजा येते. चित्रपटात दाखवलेलं रॅप बॅटल जबरदस्त लिहिलं आहे. चित्रपट थोडा मोठा आहे पण झोया अख्तरच्या कसलेल्या दिग्दर्शनानं आणि कथेनं अजिबात कंटाळवाणा होत नाही. सिनेमात एकेठिकाणी एम्स शेर म्हणतो ‘दुनिया में अगर सब कम्फर्टेबल होता तो रॅप कौन करेगा? ‘ हीच या चित्रपटाची मेन लाईन आहे. आजही अनेक गली बॉय मुंबईतील अनेक भागात आहेत. हा चित्रपट त्या सगळ्यांसाठी आहे.
एकूणच काय तर रणवीर-आलियाचा शानदार अभिनय; झोया अख्तरचं कसलेलं दिग्दर्शन आणि रॅपचा वेगळा प्रयोग एकदा बघायलाच हवा. ‘टीव्ही नाईन मराठी’कडून मी या चित्रपटाला देतोय साडेतीन स्टार्स