कंगनाचा मुख्यमंत्र्यांच्या सूटवरतीच दावा, अजब मागणीने अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने एक अजब मागणी केली आहे. कंगनाने आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला भेट दिली. या ठिकाणी तिने विविध खोल्या पाहिल्या. यावेळी कंगनाने वास्तव्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या सूटची मागणी केली. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या.
बॉलिवूड अभिनेत्री तथा मंडी लोकसभा मतदारसंघाची खासदार कंगना राणावतने अजब मागणी केली आहे. कंगनाने महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूटच (खोली) मागितल्याची माहिती समोर येत आहे. देशाची राजधानी दिल्लीत महाराष्ट्र सदन आहे. तिथे महाराष्ट्रातील आमदार, खासदार, मंत्री, पत्रकार, तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज आणि महाराष्ट्राचे सर्वसामान्य नागरीक यांच्यासाठी वास्तव्याची व्यवस्था केली जाते. अनेक मराठी पर्यटक महाराष्ट्र सदनला भेट देतात. महाराष्ट्र सदनमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांसाठी विशेष खोली असते. खासदार कंगना राणावत हिने आज महाराष्ट्र सदनला भेट दिली. लोकसभा निवडणुकीनंतर आता संसदेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरु झालं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनेक नवनिर्वाचित खासदारांनी आपल्या खासदारकीची शपथ घेतली. कंगना राणावतनेदेखील आज खासदारकीची शपथ घेतली. त्यानंतर ती आज महाराष्ट्र सदन येथे दाखल झाली.
नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वांना शासकीय निवासस्थानांचे वाटप केले जाईल. त्यामुळे सध्या खासदारांना दिल्लीत खासगी ठिकाणी मुक्काम करावा लागत आहे. कंगना राणावतने आपल्याला जोपर्यंत शासकीय निवासस्थान मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सदनमध्ये मुक्काम करण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी तिने महाराष्ट्र सदनला आज भेटही दिली. तिने महाराष्ट्र सदनमधील खोल्यांची पाहणी देखील केली. यानंतर ती महाराष्ट्र सदनमधून बाहेर पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सदनमधील मुख्यमंत्र्यांची खोली कंगनाला आवडली. त्यामुळे तिने थेट मुख्यमंत्र्यांच्या खोलीची मागणी केली. पण प्रोटोकॉलनुसार तसं देता येत नाही. त्यामुळे तिथल्या प्रशासनाने कंगनाला स्पष्ट नकार दिला.
कंगनाचा महाराष्ट्रातील बड्या नेत्याला फोन
महाराष्ट्र सदनमधील खोल्या या खूप लहान असल्याचा कंगनाचा दावा होता. त्यामुळे तिने महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला महाराष्ट्र सदनमध्ये असताना कॉल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यावेळी तिने इतर रूम छोट्या असल्याने थेट मुख्यमंत्र्यांच्या सुटची मागणी केली. पण तिच्या मागणीला महाराष्ट्र सदनमधील प्रशासनाने दुजोरा दिला नाही. तिची मागणी फेटाळण्यात आली. मुख्यमंत्र्यांचा सूट दिला जाणार नाही, असं महाराष्ट्र सदनच्या प्रशासनाने स्पष्ट सांगितलं. त्यामुळे आता कंगना महाराष्ट्र सदनात राहण्याचा निर्णय बदलण्याची शक्यता आहे.
कंगनाची अजब मागणी, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
कंगना राणावत ही खरंतर हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आली आहे. कंगना ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिची कर्मभूमी ही मुंबई आहे. असं असलं तरी हिमाचल प्रदेशमधून ती निवडून आली असल्यामुळे ती हिमाचल प्रदेशच्या सदनमध्ये जावून अशाप्रकारची मागणी करणं अपेक्षित आहे. कंगनाने महाराष्ट्र सदनमध्ये जावून थेट मुख्यमंत्र्यांच्या सूटवर दावा केल्याने महाराष्ट्र सदनमधील अधिकाऱ्यांच्यादेखील भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, कंगना राणावतने महाराष्ट्र सदनला भेट दिली तेव्हा प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी तिला महाराष्ट्र सदनमध्ये राहणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने बोलणं टाळलं. माझं महाराष्ट्राशी वेगळं नातं आहे, असं ती यावेळेला म्हणाली. महाराष्ट्र सदन खूप सुंदर आहे. माझे काही इतर मित्र इथे आहेत. त्यांना भेटण्यासाठी मी इथे आले होते, अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली.