‘नकळत सारे घडले’ नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; शुभारंभाचा प्रयोग कधी?
Nakalat Sare Ghadale Natak Shubahrambh Prayog 1 June : नवंकोरं मराठी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री श्वेता पेंडसे आणि आनंद इंगळे या दोघांसह नाटकांची टीम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. कधी आहे शुभारंभाचा प्रयोग? वाचा सविस्तर...
अभिनेते आनंद इंगळे आणि आणि अभिनेत्री श्वेता पेंडसे ही जोडी लवकरच रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच रंगभूमीवर एकत्र पाहायला मिळणार आहेत. ‘नकळत सारे घडले’ हे नवं नाटक घेऊन हे दोघे रसिकांच्या भेटीला येत आहेत. एक जूनला नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे. मराठी रंगभूमीला गौरवशाली परंपरा लाभली आहे. शेखर ढवळीकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘नकळत सारे घडले’ या नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नाटकाचे निर्माते राहुल पेठे आणि नितीन भालचंद्र नाईक आहेत.
शुभारंभाचा प्रयोग कधी?
नवनित प्रॉडक्शन्स निर्मित रूपकथा प्रकाशित ‘नकळत सारे घडले’ हे नव्या संचातील नाटक १ जूनला रंगभूमीवर दाखल होतंय.या नाटकाच्या निमित्ताने अभिनेते आनंद इंगळे आणि अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे हे दोन मातब्बर कलाकार रंगभूमीवर पहिल्यांदा एकत्र येणार आहेत. या दोघांसोबत प्रशांत केणी, तनिषा वर्दे आदि कलाकारांच्या भूमिका या नाटकात आहेत.
नाटकाचा विषय काय?
प्रत्येक पिढीचं एक मत असतं, एक दृष्टिकोन असतो. कोण बरोबर? कोण चूक? पिढ्यांमधल्या वाढलेल्या अंतराचा हा तिढा सोडवायचा तरी कसा? यावर भाष्य करत ‘नकळत सारे घडले’ मनोरंजक नाट्य आपल्या प्रत्येकालाच स्वतःकडे – विविध नाते संबंधांकडे आणि एकूणच आपल्या मूल्यव्यवस्थेकडे पहायची एक निराळी दृष्टी देते. ‘नकळत सारे घडले’ नाटकाचे संगीत अशोक पत्की यांचे आहे. नेपथ्य राजन भिसे यांचे तर प्रकाशयोजना शितल तळपदे यांची आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.
अनेक प्रतिभावान नाटककारांनी, लेखक -दिग्दर्शकांनी आपल्या वैविध्यपूर्ण नाट्यकृतींनी प्रेक्षकांची मने जिंकत रंगभूमीचा एक काळ गाजवला. तेव्हाची अनेक नाटकं आज इतक्या वर्षानंतरही नाट्य रसिकांच्या आणि निर्माता- दिग्दर्शकांच्या मनावर गारुड करून आहेत. यातील काही नाटकांना पुनरुजीवीत करण्याचे धाडस आजचे काही निर्माते करताना दिसताहेत. जुने ते सोने या उक्तीप्रमाणे काही जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन करून ती नव्या संचात सादर केली जात आहेत. अशा या क्लासिक नाटकांच्या निमित्ताने प्रेक्षकवर्ग पुन्हा मराठी नाटकांकडे वळू लागला आहे. यातच आता आणखी एका नाटकाची भर पडली आहे.