Naseeruddin Shah | “असे चित्रपट मी कधीच पाहणार..”; RRR, ‘पुष्पा’बद्दल नसीरुद्दीन शाह यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Sep 27, 2023 | 10:30 AM

नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत येतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी एस. एस. राजामौली यांच्या RRR आणि अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा' या ब्लॉकबस्टर चित्रपटांविषयी वक्तव्य केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य आता चांगलंच चर्चेत आलं आहे.

Naseeruddin Shah | असे चित्रपट मी कधीच पाहणार..; RRR, पुष्पाबद्दल नसीरुद्दीन शाह यांचं मोठं वक्तव्य
Naseeruddin Shah
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : नसीरुद्दीन शाह यांचं हिंदी सिनेसृष्टीत मोठं योगदान आहे. ते त्यांच्या दमदार अभिनयासोबतच बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनेत्यांना गौरविलं जातं. त्याचसोबत त्यांनी RRR आणि ‘पुष्पा’ यांसारख्या सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपटांवरही टीका केली. असे चित्रपट पाहण्यासाठी मला कठीण वाटतात, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले. एका युट्यूब चॅनलला त्यांनी ही मुलाखत दिली. यामध्ये ते बॉलिवूड आणि कलाकारांविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.

शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या यशावर बोलताना ते म्हणाले, “पुरुषांमध्ये हल्ली असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे. म्हणून अति-पुरुषत्वावर अधिक भर दिला जातोय. मात्र त्याचसोबत ‘अ वेडनस्डे’सारखे चित्रपटसुद्धा यशस्वी ठरत आहेत, ज्यामध्ये अतिपुरुषवादी नायक नसतो. अनुराग कश्यपच्या ‘रामप्रसाद की तेरहवीं’, ‘गुलमोहर’ यांसारख्या संवेदनशील चित्रपटांनाही त्यांची जागा मिळेल, अशी मला आशा आहे.”

RRR आणि पुष्पासारख्या चित्रपटांबद्दल ते पुढे म्हणाले, “आपली तरुण पिढी ही अधिक विकसित, अधित माहितीपूर्ण आणि समजदार आहे. मला आपल्या तरुण पिढीवर पूर्ण विश्वास आहे. मात्र RRR आणि पुष्पासारखे चित्रपट पाहून रोमांचशिवाय आणखी काय मिळतं असा प्रश्न मला पडतो. मी RRR पाहण्याचा प्रयत्न केला, मात्र मी पाहू शकलो नाही. मी अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपटदेखील पाहण्याचा प्रयत्न केला, मात्र तोसुद्धा मी पाहू शकलो नाही. पण मी मणिरत्नम दिग्दर्शित एक चित्रपट पूर्ण पाहू शकलो. कारण ते फार सक्षम दिग्दर्शक आहेत. पण RRR आणि पुष्पासारखे चित्रपट पाहण्यासाठी मी कधीच जाणार नाही.”

हे सुद्धा वाचा

नसीरुद्दीन शाह यांनी याआधी ‘गदर 2’, ‘द काश्मीर फाइल्स’ यांसारख्या चित्रपटांवरही टीका केली होती. “द केरळ स्टोरी आणि गदर 2 यांसारखे चित्रपट मी पाहिले नाहीत पण मला माहीत आहे की ते कशाबद्दल आहेत. द काश्मीर फाइल्ससारखा चित्रपट इतका लोकप्रिय होत असल्याचं पाहून खूप त्रास होतो. दुसरीकडे सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा आणि हंसल मेहता हे जेव्हा चित्रपटांमधून सत्य मांडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना लोकप्रियता मिळत नाही”, असं ते म्हणाले होते.