मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडमध्ये नाती जितक्या लवकर बनतात त्या अनेकदा तितक्या लवकरही तुटताना दिसतात. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा विवाह हा गेल्या दोन वर्षांपासून अभिनेत्री करिश्मा शर्माला डेट करत होता. करिश्माने म्युझिक व्हिडिओज, टेलिव्हिजन, वेब सीरिज आणि चित्रपटांमध्येही काम केलंय. विवाह शाहला दोन वर्षे डेट केल्यानंतर तिने ब्रेकअप केल्याची माहिती समोर येत आहे. करिश्मा आणि विवान या दोघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. आता या ब्रेकअपच्या चर्चांवर करिश्माची प्रतिक्रिया समोर आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करिश्मा म्हणाली, “होय, आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या मते आम्ही दोघं आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होतो आणि आता मला माझ्या करिअरवर अधिक लक्ष द्यायचं आहे. विवान हा माझ्यासाठी नेहमीच कुटुंबाच्या सदस्यासारखा राहील. कधी कधी दोन लोकांमध्ये काही गोष्टी जुळून येत नाहीत.”
इतकंच नाही तर करिश्माने असंही म्हटलंय की विवानसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ती तिच्या नात्यावरच जास्त लक्ष केंद्रीत करत होती. त्यामुळे तिच्या करिअरवर जास्त परिणाम होऊ लागला होता. मात्र आता तिला करिअरकडे अधिक लक्ष द्यायचं आहे. तिने नेहमीच प्रेमाचा पाठलाग केला, मात्र आता तिला करिअरमध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे. म्हणूनच ब्रेकअप केल्याचं करिश्माने स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे आयुष्याच्या या नव्या टप्प्याचाही आनंद घेत असल्याचा तिने म्हटलंय. तर दुसरीकडे विवानने त्याच्या रिलेशनशिप आणि ब्रेकअपबद्दल बोलण्यास नकार दिला आहे.
करिश्माच्या प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचं झाल्यास तिने 2015 मध्ये फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘प्यार का पंचनामा 2’ या चित्रपटात तिने टीनाची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2018 मध्ये ‘हॉटेल मिलन’, 2019 मध्ये ‘फंसते फंसाते’, ‘सुपर 30’ आणि 2022 मध्ये ‘एक विलन रिटर्न्स’ या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. दुसरीकडे विवान शहा याच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचं झाल्यास 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सात खून माफ’ या चित्रपटात तो पहिल्यांदा झळकला होता. प्रियांका चोप्राची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये ‘हॅप्पी न्यू इयर’, 2015 मध्ये ‘बॉम्बे वेलवेट’, 2017 मध्ये ‘लाली की शादी में लड्डू दिवाना’, 2020 मध्ये ‘कबानी द कॉइन’ आणि 2023 मध्ये ‘कोर्ट; या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत.