सिनेमा मराठीत का बनवला नाही? स्क्रिप्ट चांगली नाही; ‘छावा’ सिनेमावर मराठमोळ्या अभिनेत्रीची टीका
सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये तिने 'छावा' सिनेमाविषयी जे काही लिहिले आहे ते चर्चेत आहे.

‘छावा’ या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमात अभिनेता विकी कौशल आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सर्वसामान्यांपासून ते बड्या कलाकारांपर्यंत अनेकांनी चित्रपट पाहून प्रशंसा केली. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्रीने ‘छावा’ सिनेमा मराठीमध्ये का बनवला नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’या मालिकेत लीलाला सतत त्रास देणाऱ्या श्वेताची भूमिका साकरणारी अभिनेत्री अक्षता आपटेने ही पोस्ट लिहिली आहे. अक्षताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला ‘छाव’ सिनेमा पाहिल्यानंतर पोस्ट केली आहे. “‘छावा’बद्दल बोलायचे झाले तर हा सिनेमा आपण एकदाच पाहू शकतो असा आहे. जे आपल्याला आधीच माहिती आहे तेच दाखवले. पहिला भाग एवढं काही नाही, पण दुसरा भाग छान आहे. सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे पण स्क्रिप्ट चांगली नाही. सिनेमाचे म्युझिक म्हणजे बिग नो. अजिबात चांगले नाही. दिग्दर्शन चांगले पण आहे आणि वाईट पण. कॉस्च्युम आणि हेअर मेकअप फार छान आहेत” या आशयची पोस्ट तिने लिहिली.

Akshata Apte
या पोस्टमध्ये तिने पुढे म्हटले की, “विकी कौशलने खूप उत्तम अभिनय केला आहे. अक्षय खन्नाने सुद्धा विकी कौशलच्या तोडीस तोड भूमिका साकारली आहे. पण रश्मिका मंदानाचा अभिनय किंवा ती या भूमिकेसाठी अजिबात योग्य वाटत नाही. बाकीचे सहाय्यक कलाकार उत्तम आहेत. एकंदरीत मनोरंजन म्हणून पाहण्यासाठी हा एक उत्तम सिनेमा आहे. छत्रपती संभाजी महाराजांना ज्या परिस्थितीतून जावे लागले त्याबद्दल अजून जाणून घ्यायची अपेक्षा होती. इतर प्रेक्षकांप्रमाणेच मला सुद्धा शेवटचा क्षण पाहून खूप रडू आले. पण चित्रपटाच्या प्रभावामुळे असे झालेले नाही. आपण महाराजांचा आदर करतो म्हणून आपल्या भावना दाटून येतात.”




या पोस्टमध्ये अक्षताने ‘छावा’ सिनेमासाठी रश्मिका मंदाना योग्य नसल्याचे म्हटले आहे. “दुर्दैवाने सिनेमात रश्मिकाचा तोच एक्सेंट ऐकायला येतो. तिची अभिनय करण्याची स्टाइल आपण साऊथ सिनेमांमध्ये पाहिली तशीच आहे. त्यामुळे ती महाराणी येसूबाईंची भूमिका साकारण्यासाठी अजिबात योग्य नाही. विकी कौशलचा अभिनया हा उत्कृष्ट आहे. स्क्रिप्टमध्ये आणखी वैविध्यपूर्णता असती तर कदाचित आणखी वेगळ्या पद्धतीने मांडण्याची संधी मिळाली होती. सिनेमात खूप कमी संवाद मराठीमध्ये आहेत. त्यांनी हा सिनेमा मराठीमध्ये का बनवला नाही? मराठी लोकांना आणखी कनेक्ट होता आलं असतं” असे अक्षता म्हणाली.