मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरील बंदीला स्थगिती दिल्यानंतरही काही राज्यांमध्ये अद्याप थिएटर्समध्ये हा चित्रपट दाखवला जात नाहीये. सुदिप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटाने कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र अजूनही त्यावरून देशातील काही राज्यांमध्ये वाद सुरू आहे. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना कशा पद्धतीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं धर्मांतर केलं जातं, कशा पद्धतीने त्यांना ISIS या दहशतवादी संघटनेत सामील केलं जातं, याविषयीची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. मात्र या चित्रपटातून विशिष्ट वर्गाच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे. तर काहींनी चित्रपटात दाखवण्यात आलेल्या गोष्टींवरून प्रश्न उपस्थित केला आहे. आता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने या चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपने ‘द केरळ स्टोरी’च्या बंदीवरून एक ट्विट केलं होतं. ‘तुम्ही चित्रपटाशी सहमत असो किंवा नसो, तो चित्रपट प्रचारकी असो किंवा नसो, आक्षेपार्ह असो किंवा नसो, त्या चित्रपटावर बंदी आणणं हे चुकीचंच आहे’, असं त्याने लिहिलं होतं. या ट्विटवरून नवाजुद्दीन सिद्दिकीला प्रश्न विचारला असता त्यानेही अनुरागच्या मताशी सहमती दर्शविली. मात्र पुढे तो म्हणाला, “एखादा चित्रपट किंवा कादंबरी जर काही लोकांच्या भावना दुखावत असेल तर हे चुकीचं आहे. आम्ही प्रेक्षकांना किंवा त्यांच्या भावना दुखावण्यासाठी चित्रपट बनवत नाही.”
“जर चित्रपटात लोकांमध्ये दरी निर्माण करण्याची आणि सामाजिक समरसता तोडण्याची ताकद असेल तर हे खूपच चुकीचं आहे. आपल्याला या जगाला जोडायचं आहे, तोडायचं नाही”, असंही तो पुढे म्हणाला. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्मा, सिद्धी इदनानी, योगिता बिहानी आणि सोनिया बलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल याठिकाणी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. त्यानंतर निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ट्विटमधून बॉलिवूडला आरसा दाखवला आहे. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाबाबत त्यांनी काही ट्विट्स केले होते. यामध्ये त्यांनी लिहिलं होतं, ‘आपण इतरांशी आणि स्वत:शी खोटं बोलण्यात इतके सहज झालो आहोत की जेव्हा कोणी पुढे जाऊन सत्य दाखवतो, तेव्हा आपल्याला धक्काच बसतो. ‘द केरळ स्टोरी’च्या जबरदस्त यशावर बॉलिवूडचं मृत्यूसारखं मौन सर्वकाही स्पष्ट करतोय.’